वडगाव येथे मुरूम चोरणारांवर वनविभागाची कारवाई

चौघांवर गुन्हे || चौतीस लाखांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील वडगाव येथील वनविभागाच्या जागेतून बेकायदा मुरूम वाहून नेणार्‍या चौघांविरु्ध्द वनविभागाने वनकायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी रात्री अकरा वाजता केलेल्या कारवाईत एक जेसीबी,तीन ट्रॅक्टर असा चौतीस लाखांचा ऐवज वनाधिकार्‍यांनी जप्त केला आहे.

सुरेश बन्सी कावळे, भाऊसाहेब जगन्नाथ बडे, ज्ञानेश्वर आत्माराम गरड, परमेश्वर आत्माराम गरड (सर्व रा. वडगाव) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. वडगाव येथे वनविभागाच्या क्षेत्रामध्ये मुरूम चोरी होत असल्याची खबर रविवारी रात्री नऊ वाजता वनपरीक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांना मिळाली. अरुण साबळे, आप्पासाहेब घनवट, विजय पालवे, वर्षा गिते, सविता रायकर हे रात्री साडेदहा वाजता वडगाव येथे पोहचले. तेथे एक जेसीबी मशीन मुरूम काढत होते.

तर तीन ट्रॅक्टर मुरूम वाहून घेऊन जात होते. वनाधिकार्‍यांनी वनविभागाच्या जागेतून मुरुमाची चोरी करणार्‍यांना पकडून वाहनासह पाथर्डीच्या कार्यालयात आणले. सकाळी पंचनामा करून माहिती घेतली. यामध्ये वनविभागाचे दराडे, घोडके, शिरसाट, पठाण यांनी सहकार्य केले. संशयितांविरुद्ध भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26, 41, 42 व 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर असा 34 लाख रुपयाचा ऐवज वनाधिकार्‍यांनी जप्त केला आहे.

महिला कर्मचार्‍यांचे कौतुक

वडगावच्या मुरुम चोरीच्या कारवाईत वर्षा गिते आणि सविता रायकर यांनी सहभाग घेतला.रात्री चार वाहने पाथर्डीकडे आणताना ह्या महिला कर्मचारी ट्रॅक्टरमध्ये बसून हे ट्रॅक्टर पाथर्डीला घेऊन आल्या. रात्रीच्या वेळी महिला कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. वडगाव येथील काही लोक तडजोड करण्याची विनंती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे रात्री बारा वाजता करीत होते.कारवाई होणार असे अधिकार्‍यांनी ठणकावून सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com