अहमदनगर : लस संपली!

शुक्रवार, शनिवारनंतर रविवारीही लसीकरण राहणार बंद
अहमदनगर : लस संपली!

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाला आवर घालण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे करोना लस. मात्र ही लस नगर शहरात कालपासून संपली असून आजही लसीचे नवे डोस आले नाहीत. परिणामी उद्या रविवारीही लसीकरण बंद राहिल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने नगरकरांनी करोना लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. लस घेतल्याने करोनापासून संरक्षण होते, या भावनेतून नगरकरांची लस घेण्यासाठी चढओढ सुरू असल्याचे चित्र गत महिनाभरापासून शहरातील आरोग्य केंद्राबाहेर दिसते आहे. आता लसच संपल्याने हे केंद्रही ओस पडली आहेत. केंद्राबाहेर लस संपल्याचे बोर्ड झळकत आहेत.

पहिला डोस घेतलेल्यांची दुसर्‍या डोसची मुदतही संपली आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नगरकर केंद्राकडे धाव घेतात, मात्र तेथील बंदचा बोर्ड पाहून माघारी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्याकडे नाही. लस टंचाई निर्माण झाल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले आहे. फक्त 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.

शुक्रवारपासूनच नगर शहरातील लस संपली. नागापूर आणि मुकुंदनगरच्या केंद्रावर शिल्लक असलेले डोस शुक्रवारी नागरिकांना देण्यात आले. त्यानंतर आज शनिवारी लस नसल्याने लसीकरण बंद राहिले. आज उशिरापर्यत नव्याने लस आली नाही. त्यामुळे उद्या रविवारीही लसीकरण बंदच राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

संशयितांची तपासणी मात्र सुरूच

रविवारची सुट्टी असली तरी महापालिकेचे आरोग्य केंदातून करोनासंदर्भातील कामे सुरूच आहेत. लस नसल्याने संशयितांची अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी सुरू आहे. ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील त्यांना कोवीड सेंटरमध्ये भरती केले जाते. त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांचीही तपासणी केली जात आहे. हे काम रविवारच्या सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com