लसीकरण न करणार्‍यांचे रेशनकार्ड रद्द करणार

लसीकरण न करणार्‍यांचे रेशनकार्ड रद्द करणार

सलाबतपूर येथील बैठकीत नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची नागरिकांना तंबी

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

लसीकरण न करणार्‍या नागरिकांवर रेशनकार्ड रद्द करण्यासारख्या कडक कारवाईचा बडगा उगारणार असल्याची तंबी देत दोन दिवसात लसीकरण करण्याचे आवाहन नेवाशाचे तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले. करोनाने पुन्हा आपली दहशत सुरू केली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सलाबतपूर येथे ग्रामपंचायत सभागृहात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

सध्या करोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे गावागावात लसीकरण जनजागृतीचे काम सुरु असून लसीकरण न करणार्‍या नागरिकांवर कडक कारवाई करताना रेशनचा लाभ न देता रेशनकार्ड रद्द करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच इतरही लाभांपासून त्या नागरिकांना वंचित ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या व्यापार्‍यांनी अद्याप लसीकरण केलेच नाही त्यांना दहा हजाराचा दंड करण्यात येईल व दुकानही सील करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच नियमित मास्क वापरून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. लसीकरण दोन दिवसात पूर्ण करण्यासंदर्भात ग्रामसेवक, कामगार तलाठी, पोलीस पाटील, प्राथमिक शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनीही आपआपल्या प्रभागात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणाच्या सुचना केल्या.

तालुका वैद्यकिय अधिकारी अभिराज सूर्यवंशी व ग्रामीण रुग्णलयाचे डॉ. बागवान यांनी लसीकरण कसे गरजेचे आहे याचे महत्व विषद केले. सलाबतपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल चिंधे यांनी गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊपर्यंत कॅम्प सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर शेलार, ज्येष्ठ नागरीक वहाब शेख, सरपंच अझर शेख, संजय देशमुख, अश्पाक शेख, अनंत ढोले, अर्जून बनकर, डॉ. उमेश ठाकूर, शामसुंदर दळवी, पोलीस पाटील रजिया शेख, तलाठी अशोक कैंकेद, ग्रामसेवक दिलीप शेळके, रफिक शेख, दादासाहेब देशमुख, अतावुल्ला शेख, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब गोरे, रोहिदास भगत उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com