बाजारात येणार्‍या सर्वच जनावरांचे लसीकरण करा- आमदार काळे

बाजारात येणार्‍या सर्वच जनावरांचे लसीकरण करा- आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

जनावरांचे बाजार सुरळीतपणे पुन्हा सुरु होण्यासाठी प्रत्येक जनावराचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलून जनावरांच्या बाजारात येणार्‍या प्रत्येक जनावराचे लसीकरण करून घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत.

कृषी विभागाच्या तालुका समन्वय समितीची बैठक नुकतीच आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विजय बोरुडे यांच्या दालनात पार पडली. यावेळी शेतकर्‍यांनी जनावरांच्या बाजारात येत असलेल्या अडचणी मांडल्या. मागील महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जनावरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जनावरांचे बाजारात शेतकरी आपले जनावरे विक्रीसाठी आणत आहेत. मात्र जनावरांचे लसीकरण झाले नसल्यामुळे बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्री करतांना अडचणी येत आहे.

कोपरगाव शहरातील जनावरांचा बाजार अतिशय मोठा आहे. या बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. मात्र जनावरांचे लसीकरण प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हि उलाढाल मंदावली असून त्याचे आर्थिक परिणाम जाणवत असून शेतकर्‍यांना अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठी जनावरांचे बाजारात जी जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतील त्या जनावरांचे लसीकरण तातडीने करून घ्या जेणेकरून जनावरांचा बाजार सुरळीतपणे सुरु होईल अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, रोहिदास होन, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कारभारी आगवण, राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com