लसीकरणावरुन 'हे' आरोग्य अधिकारी वादाच्या भोवर्‍यात

लसीकरणावरुन 'हे' आरोग्य अधिकारी वादाच्या भोवर्‍यात

आ. विखे करणार मुख्य सचिवांकडे तक्रार

आश्वी |वार्ताहर| Ashwi

निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेला लसीचा डोस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दबावातून जोर्वे येथील आरोग्य केंद्रात पाठविल्याने असंख्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहीले. यासंदर्भात त्यांची चौकशी करण्याची मागणी होत असून, त्यांच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे देशभर लसीकरण मोहीम सुरू आहे. तालुक्यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र मागील काही दिवसांपासून निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम ठप्प झाल्याने या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या गावांमधील नागरिकांना लस न मिळाल्याने माघारी फिरावे लागले.

या घटनेबाबत डॉ. सुरेश घोलप यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकार्‍यांकडे झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोलप चांगलेच वादात सापडले आहेत. लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल आ. विखे पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि गटविकास अधिकार्‍यानांही धारेवर धरले.

निमगावजाळी येथील लसींचा डोस डॉ. घोलप यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावामुळे जोर्वे येथे पाठवला. याबाबत इन्सीडंट कमांडर असलेल्या अमोल निकम यांना कोणतीच कल्पना नसल्याचे समजते. त्यामुळे या गंभीर घटनेबाबत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना काल आश्वी येथे झालेल्या एका बैठकीत चांगलेच धारेवर धरले.

कोणाच्या सांगण्यावरून जर शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील तर ते खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका, आशा शब्दात आ. विखे पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांना खडेबोल सुनावल्याचे कळते. या बैठकीस उपस्थित असलेल्या तहसिलदार अमोल निकम यांनाही याची चौकशी करण्यास विखे पाटील यांनी सांगितले.

सध्याचे वातावरण गंभीर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. परंतू अशा परिस्थितीत तुम्ही मनमानी करणार असाल तर तुमच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करावीच लागेल, तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही, अशा कडक शब्दात आ. विखे यांनी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना सुनावले.

निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी परस्पर दुसरीकडे पाठवल्याने असंख्य ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागले. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 18 गावे असल्याने नागरीक सकाळीच लांबून येतात याचा विचार आरोग्य विभागाने करायला हवा.

- अमोल जोंधळे, उपसरपंच, निमगावजाळी

जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना सुध्दा कळवले नाही. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी गलिच्छ राजकारण करून ठराविक कुटूंबियांना लस दिली. यामुळे जोर्वे आणि पंचक्रोशीत सामान्य नागरीक लसीकरणापासून वंचित राहीले.

- गोकुळ दिघे, उपसरपंच, जोर्वे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com