उती संशोधनातून बटाटे रोपनिर्मितीचा पहिला प्रयोग वीरगावात

उती संशोधनातून बटाटे रोपनिर्मितीचा पहिला प्रयोग वीरगावात

विरगाव |वार्ताहर| Virgav

भारतातील हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांनंतर टिश्युकल्चर (उती) संशोधन पध्दतीने बटाटे बेणे निर्मितीचा पहिला सांघिक प्रयोग अकोले तालुक्यातील वीरगावात होणार आहे.

अकोले तालुका कृषी विभाग, ग्रीन इनोव्हेशन सेंटर पुणे आणि आत्मा या त्रयींतर्फे शेतकर्‍यांना बटाटे बेणे निर्मितीत स्वयंपुर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.अकोले तालुक्यात साधारण 2 हजार 500 हेक्टरवर बटाटा लागवड होते. परंतु अनेकवेळा भेसळयुक्त बेणे पदरात पडल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होते. बटाटा लागवडीत सर्वाधिक खर्च हा बेण्यावर होतो. बटाट्याच्या लागवडीची सुरुवातच भेसळयुक्त बेण्यातून झाल्याने पिकाची अपरिमित हानी होते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन खर्च करुनही पदरात काही पडत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर पर्याय म्हणून टिश्युकल्चर पद्धतीने बेणे निर्मितीचा प्रयोग सांघिक पद्धतीने अकोले तालुक्यात राबविण्यात येत आहे.

टिश्युकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचा प्रयोग पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर होतो. आपल्या देशातही हिमाचल प्रदेश, कर्नाटक, ओडिशा या राज्यांमध्ये हा प्रयोग करून भेसळमुक्त बेणे निर्मिती केली जाते. प्रथमच अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना टिश्युकल्चर संशोधितच बेणे भेटल्यास बटाटे उत्पादनवाढीस मोठी मदत होईल. शेतकर्‍यांच्या सांघिकतेतून हा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तीस एकर लागवड होईल इतके बटाटा बेणे निर्माण करण्यात येईल. अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना टिश्युकल्चर संशोधित बियाणे मिळाल्यास बटाटे उत्पन्नात मोठी वाढ होईल.

वीरगाव येथील विश्व हायटेक नर्सरी मध्ये उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे ट्रे मध्ये रोपण करून लागवडी योग्य बनवण्यासाठी प्रात्यक्षिक प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बटाटा पीक व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी उती पध्दतीने निर्मित बेणे शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कमी खर्चिक परंतु परिणामकारक तांत्रिक पद्धतीमुळे अकोले तालुक्यातील बटाटे उत्पादनात मोठी भर पडणार आहे. या प्रयोगामुळे शेतकर्‍यांनाही उत्तम प्रतीचे बेणे उपलब्ध होणार असल्याने त्यांची कायम होणारी फसवणूक थांबेल.

याप्रसंगी अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीणकुमार गोसावी, ग्रीन इनोव्हशन सेंटर पुणेच्या श्रीमती संगीता पाटील, विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात, आत्माचे बाळनाथ सोनवणे, मंडल कृषीअधिकारी बाळासाहेब बांबळे, राजाराम साबळे, कृषी पर्यवेक्षक आर. पी. पाडवी, करंडीचे सरपंच संपत गोंदके, प्रभाकर हांडे, गोविंद जाधव यांचेसहित तालुक्यातील अनेक बटाटा उत्पादक शेतकरी हजर होते.

बटाटे बेण्यात होणारी भेसळ, रोग व किडीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बटाट्याच्या उत्पादनात वर्षागणिक मोठी घट होत आहे. उती संवर्धन (टिश्युकल्चर) पद्धतीने तयार केलेली रोपे प्रात्यक्षिकाद्वारे लागवड करून पुढील हंगामासाठी बटाटे बेणे निर्मितीचा हा प्रयोग आहे. मागील वर्षी बटाटे अभियानात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करण्याच्यादृष्टीने बटाटा उत्पादक गटाच्या सहभागातून हा प्रयत्न आहे. बटाटा संशोधन केंद्र बेंगलोर यांचे तांत्रिक मार्गदर्शनाखाली ग्रीन इनोव्हेशन्स सेंटरच्या मदतीने यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच भेसळमुक्त बटाटे बेणे निर्मितीचा हा पथदर्शी प्रयोग राबविला जाणार आहे. हा प्रयोग नक्की यशस्वी होणार असल्याने बटाटे बेणे निर्मितीत शेतकरी स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.

-प्रवीणकुमार गोसावी, अकोले तालुका कृषी अधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com