
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल लागला असून यंदा नगर जिल्ह्यातील सात विद्यार्थी चमकले आहेत. बेलापूरचा अभिषेक दुधाळ, सुकेवाडीचा मंगेश खिलारी, कोल्हारचा सागर खर्डे, चापडगावची श्रृती कोकाटे, मांचीचा स्वप्नील डोंगरे, पिंपरणेची राजश्री देशमुख आणि महारूद्र भोर याचे घवघवीत यश संपादन केले आहे. संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यानी दणदणीत यश संपादन केले आहे.
बेलापूर वार्ताहराने कळविले की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिसऱ्यांदा युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवीले असुन नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात 278 क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला आहे
अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या 23 व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला होता. त्या वेळी त्याला 637 रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले या ठिकाणी सेवेत हजर होऊन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला. अभ्यास सुरुच ठेवला. दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने 2020 मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात 469 वा रँंक मिळविला. इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले. यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला. त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला आणि पुन्हा परिक्षा दिली व नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला 278 रँक मिळाले आहे.
सलग तिन वेळा परिक्षा देवून तिनही वेळेस वरची रँक मिळविणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापूर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर येथे झाले. त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला. कठोर अशी मेहनत घेऊन सलग तिसर्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवीले याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
टिळकनगर येथील डहाणूकर विद्यालयातील सेवानिवृत्त विज्ञान अध्यापक दिलीप विठ्ठलराव दुधाळ यांचा तो मुलगा आहे. कोल्हार भगवतीपूरचे भूमिपूत्र सागर यशवंत खर्डे याची एआयआर 445 निवड झाली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल मंगळवार (दि.23) रोजी जाहीर झाला. यात नगरच्या महारुद्र जगन्नाथ भोर हे उत्तीर्ण झाले आहेत. नगरचे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ते चिरंजीव आहेत. कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील श्रृती सुभाष कोकोटे हिने 608 रँक संपादन केली आहे.
महारुद्र भोर हे नगरच्या भिस्तबाग, येथील रहिवाशी असून त्यांचे मूळ गाव अकोळनेर (ता. नगर) आहे. त्यांनी सिंहगड कॉलेज पुणे येथून बी. ई. मॅकेनिकलची पदवी घेतली आहे. भोर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, सावेडी नगर येथे केले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण आरवायके कॉलेज नाशिक येथून पूर्ण केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा व राज्यभरातून कौतुक होत आहे. पहिल्यापासूनच वाचनाची आवड त्यांच्यामध्ये होती.
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला असून या परिक्षेत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मंगेश पाराजी खिलारी याने 396 वा क्रमांक तर मांची येथील स्वप्नील राजाराम डोंगरे याने 707 वा क्रमांक, पिंपरणे येथील राजश्री शांताराम देशमुख हिने 719 वा क्रमांक पटकविला आहे. या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्याची मान उंचावली आहे.
मंगेश खिलारी याचे प्राथमिक शिक्षण सुकेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण पुणे येथील एसपी कॉलेजमध्ये कला शाखेतून पॉलिटिकल सायन्स या विषयातून पूर्ण केले. वडील पाराजी खिलारी हे चहाची टपरी चालवतात तर आई विडी कामगार आहे. अत्यंत कठिण परिस्थितीतून मंगेश खिलारी याने युपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे.
स्वप्नील राजाराम डोंगरे याने बीई मॅकेनिकल पदवी घेतली आहे. तीन वर्षापासून युपीएससी परीक्षेचा अभ्यास त्याने दिल्लीत केला. अखेर स्वप्नीलने यशाला गवासणी घातली. स्वप्नीलचे वडील राजाराम डोंगरे हे वीज वितरण कंपनीत नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता आहेत तर आई वैशाली डोंगरे या महानगरपालिकेत प्राथमिक शिक्षिका आहेत.
राजश्री शांताराम देशमुख हिचे प्राथमिक शिक्षण डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये झाले तर उच्च माध्यमिक श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात झाले. तिने इंजिनिअरींग मधून पुणे एमआयटी कॉलेज मधून पदवी प्राप्त केली आहे. राजश्री हिचे वडील शांताराम उत्तमराव देशमुख हे माजी सैनिक आहे तर आई गृहिणी आहे.
मंगेश खिलारी, स्वप्नील डोंगरे, राजश्री देशमुख या यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख यांचेसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
हे यश संगमनेरसाठी अभिमानास्पद - आ. थोरात
गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शैक्षणिक हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षण व महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.