UPSC : नगरच्या पाच जणांचा झेंडा

श्रीरामपूरचा दुधाळ, सोनईच्या पालवेचा समावेश
UPSC : नगरच्या पाच जणांचा झेंडा

अहमदनगर (प्रतिनिधी)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षीच्या न परीक्षांचा निकाल शुक्रवार (दि.२४) जाहीर झाला असून यात नगर जिल्ह्यातील ५ जणांनी यश मिळवले आहे.

विनायक नरवडे (रँक ३७), सुहास गाडे (रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) हे यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत.

यातील विनायक नरवडे हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातील विनायक कारभारी नरवडे हा नगर येथील सावेडीतील असून त्याचे प्राथमिक शिक्षण आठरे पाटील स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा महाविद्यालयात पूर्ण झाले. पुढे पुणे येथून अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेऊन त्याने अमेरिकेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली व काही काळ नोकरीही केली. परंतु आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे तो पुन्हा मायदेशी परतला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, यंदाच्या परीक्षेत त्याने अखेर यशाला प्राप्त केले आहे.

विनायकने देशात ३७ वी रँक पटकावली असून राज्यात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. विनायकचे वडील व बहिण डॉक्टर असून आई गृहिणी आहे. आपण केलेल्या कष्टाचे हे चीज असून कुटुंबियांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे विनायकने सांगितले.

अभिषेक दिलीप दुधाळ याने यूपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. अभिषेक हा बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील असून त्याला ४६९ वी रँक मिळाली आहे. अभिषेकचे वडील दिलीप दुधाळ हे शिक्षक, तर आई संगीता गृहिणी आहेत.

विकास बाळासाहेब पालवे हा मूळ सोनई (ता. नेवासा) येथील असून त्याने ५८७ वी रँक मिळवली. गेल्या चार वर्षांपासून तो यूपीएससीची तयारी करीत होता. त्याचे वडिल बाळासाहेब पालवे हे शिक्षक, तर आई शोभा या गृहिणी आहेत.

Related Stories

No stories found.