ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या कामास वेग येणार

जलसंपदाचीही मान्यता, नगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांना वरदान ठरणार
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना वरदान ठरणार्‍या नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याच्यादृष्टीने सरकारने कार्यवाही सुरू केली असून या प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास रु.1498.61 कोटी इतक्या किंमतीस जलसंपदा विभागानेही मान्यता दिल्याने या प्रकल्पाचा मार्ग सुकर होणार आहे.

2018-19 ची दरसूची व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2019-20 च्या दरसूचीवर आधारित एक हजार 498 कोटी 61 लाखांच्या प्रस्तावास अटींवर जलसंपदा विभागाने मान्यता दिली असून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

प्रस्तावातील रकमेपैकी एक हजार 394 कोटी सहा लाख रुपये प्रत्यक्ष कामासाठी आणि 104 कोटी 55 लाख रुपये अनुषंगिक कामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविणार्‍या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मांजरपाड्यासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, काँक्रिटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची कामे मार्गी लागणार आहेत.

हा प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण व आदिवासी क्षेत्रातील असून, गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहे. या प्रकल्पाच्या पाणीवापरानुसार नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील 74 हजार 210 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनास लाभ होणार आहे.

प्रकल्पात समाविष्ट असलेल्या वळण योजनांच्या माध्यमातून गोदावरी या तुटीच्या खोर्‍यासाठी पावसाव्यतिरिक्त पाण्याचे कायमस्वरूपी स्रोत तयार होणार आहेत. यातील वळण योजनांद्वारे उपलब्ध होणार्‍या पाण्यातून नाशिक व नगर जिल्ह्यातील सिंचनाची तूट भरून निघणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com