अपर जिल्हाधिकार्‍यांसह 38 जणांविरूध्द गुन्हा

जमीन व्यवहारातून शासनाची फसवणूक
अपर जिल्हाधिकार्‍यांसह 38 जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खोटी कागदपत्रे, दस्त नोंदणी करत महार वतन हाडोळा इनाम जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करून शासनाची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालीन अपर जिल्हाधिकार्‍यांसह 38 जणांविरूध्द काल (बुधवारी) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. 2006 मधील ही घटना आहे.

वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारातील गट नं. 203 मधील कनिष्ठ महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ची जमीन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसीलदार एल. एन. पाटील यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. त्यांनी काढलेल्या आदेशास तलाठी एल. एस. रोहकले, मंडळ अधिकारी दुर्गे यांनी मदत केली आहे. तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे यांना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असून देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होऊन सदर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले असल्याचे तपासातून आढळून आले आहे.

तत्कालीन सह दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली याने खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे. तसेच नमुद जमिनीचे भोगवटादार दिनकर शिंदे, विनायक शिंदे, बाबू शिंदे, मोहन शिंदे, वामन शिंदे, यादव शिंदे, सदाशिव शिंदे, रामभाऊ शिंदे, सुनील शिंदे, यादव शिंदे, मालनबाई शिंदे, लता भाकरे, अरुण शिंदे, शालनबाई शिंदे, लक्ष्मण शिंदे, मथुरा शिंदे, संदीप शिंदे, सुनीता गायकवाड, नंदा घाटविसावे, शालुबाई प्रभुणे, मच्छिंद्र शिंदे, लिलाबाई पाडळे, शोभा ठाकुर तसेच संमती देणारे वत्सलाबाई पाचारणे, सुशिला घाटविसावे, तुळसाबाई नरवडे, बुबाई साळवे, इंद्रायणी जाधव, वत्सला जाधव, कौसल्या जगताप यांचे जनरल मुखत्यार उत्कर्ष पाटील व जमिन खरेदी करणारे अजित लुंकड यांना सदरची जमीन ही महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ब ची असल्याचे माहीत असून देखील खरेदी विक्री व्यवहार करुन शासनाची फसवणूक केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com