
अहमदनगर (प्रतिनिधी)
नारायणडोह (ता. नगर) येथे 11 एकर जागेवर नव्याने साकारले जात असलेल्या वर्ग- 1 च्या कारागृहाच्या कामाला गती मिळाली आहे. यामध्ये बंदिवानांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कारागृहात 500 बंदीवानांसाठी नियमावलीप्रमाणे कारागृह आणि 125 कर्मचारी यांच्या वसाहतीचे सर्व सोयीनियुक्त बांधकाम केले जाणार आहे. नवीन कारागृहात इनडोअर व मैदानी खेळाचे मैदान, व्यायामाची व्यवस्था, सांस्कृतिक हॉल, विशेष मुलाखत कक्ष, ओपीडी आदी सुविधांचा समावेश आहे. स्वतंत्र्य महिला बंदिवानांचा विभाग, अतिसुरक्षा विभाग यांचा समावेश राहणार आहे.
2013 मध्ये तत्कालीन कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर काळे यांच्या कार्यकालात या नवीन कारागृहाला मंजुरी मिळाली होती. मध्यंतरी मात्र हे काम ठप्प होते. आता काळे बदली होऊन पुन्हा नगरला आल्याने त्यांनी हे काम पुर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या कामाच्या प्राथमिक प्रक्रिया काही महिन्यातच पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
औरंगजेबच्या कार्यकाळातील सबजेल या वास्तूचे 1890 सालापासून कारागृहात रूपांतर झाले. 35 गुंठ्याच्या जागेत असलेल्या सबजेल कारागृहात अनेक अडचणींचा सामना बंदिवान व कारागृह अधिकारी, कर्मचारी यांना करावा लागत आहे. महिला बंदीवानांसाठी जागा नसल्याने त्यांना पुणे कारागृहात पाठवावे लागत आहे.
बंदिवानसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुविधा पुरविणे व जागेची मोठी अडचणीचा सामना करावा लागत असल्याने या कारागृहाचे रुपांतर प्रशस्त जागेत होण्यासाठी कारागृह अधीक्षक काळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन नारायणडोह येथील वर्ग-1 चे कारागृह उभारण्यासाठी 3 जुलै 2013 मध्ये मंजूरी मिळवली होती. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 7 फेब्रुवारी 2018 रोजी या कामाला मंजुरी दिली आहे. मात्र पाठपुरावा नसल्याने या कामाला चालना मिळाली नाही. आता कारागृहाच्या कामाला गती मिळाली आहे.
नारायणडोह कारागृहाचे प्रस्तावित कामासाठी प्राथमिक अडचणी सोडविण्यात आल्या असून, जागेची मोजणी, एन.ए. यांसारखी प्रक्रिया पुर्णत्वाकडे असून, लवकरच अद्यावत कारागृह उभारणीचे काम सुरु होणार आहे.
- ज्ञानेश्वर काळे, कारागृह अधीक्षक.