
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगरसह राज्यातील 92 नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूका जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर आली असून निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी पक्षाची खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.
मुंबईत पक्षाच्या कार्यालयातही बैठक होणार आहे. यावेळी जिल्हानिहाय निवडणुकीबाबत चर्चा होणार असून पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादीकडून येणार्या सर्व निवडणूका आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केला आहे.
नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी असली तरी राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील भाजपला पुन्हा संजीवनी मिळल्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यातील भाजपची जबाबदारी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली असून त्यापार्श्वभूमीवर नगरपालिका आणि नगर परिषद निवडणूका, त्यानंतर होणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी पक्षाची भूमिका काय ठेवायची याबाबत मंगळवारच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते आ. अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह संघटनात्मक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीचा अद्याप आमदारांना निरोप नसला तरी ऐनवेळी त्यांना बोलविणार की जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून पुन्हा पुढील बैठकीत त्यांना निमंत्रित करणार हे पाहवे लागणार आहे.
जिल्हानिहाय बैठका झाल्यानंतर दुपारनंतर युवक राष्ट्रवादी ची स्वतंत्र बैठक होणार आहे. यात युवकांनी आगामी निवडणुकीत काय धोरण ठेवावे, सामान्यांपर्यंत कसा संपर्क करावा, याबाबत खा. पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.