अहमदनगर (प्रतिनिधी) -

जूून ते ऑक्टोबर 2020या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी नगर जिल्ह्याला 73 कोटी 50 लाखांचा निधी

प्राप्त झालेला असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाचे शेतकर्यांना दणका दिला आहे. श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, अकोले तालुक्यात रात्रभर रिपरिप सुरू होती. राहुरीच्या पश्चिमेकडील काही गावात ढगफुटी झाली. या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहेत. कांदा, हरभरा या पिकांवर मावा, करपा रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. तर द्राक्ष पिकांनाही दणका बसणार आहे.

श्रीरामपूर शहर व तालक्यात गुरूवारी रात्री सुरू झालेली रिपरिप शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती. संगमनेरातही हीच स्थिती होती. साकूर पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा जादा होता. अकोलेत शुक्रवारी सकाळी पाऊस झाला. तर तालुक्यात गुरूवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. काही ठिकाणी गहू पिकाचे नुकसान झाले आहे.

राहाता तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. या पावसामुळे फूल गळती झाली आहे. तसेच यापावसाच्या पाण्यामुळे द्राक्षफुले सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपळसचे द्राक्ष उत्पादक प्रमोद निरगुडे यांनी दिली.

दक्षिण नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी रिपरिप झाली तर ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, ज्वारी पिकांवर परिणाम जाणवत आहेत. रब्बी हंगामातील पिके चांगलीच तरारली आहेत. संत्रा, डाळिंब ही तोडणीला आले आहेत. अशातच अवकाळी पाऊस झाल्या फळझाडांची गळ होणार असून पुन्हा शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर फवारे मारून शेतकरी पुरता बेजार झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी सकाळी नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळ्या यामुळे कांदा, गहू, चारा पिके, हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणात रोंगाचा प्रार्दभाव झाला आहे. आज शनिवारी देखील हवमान खात्याने पावसाचा अंदाज दिलेला असल्याचे सर्वांच्या अडचणी वाढणार आहेत.

घाटघरला 7 मिमी पावसाची नोंद

भंडारदरा पाणलोटात गुरूवारी रात्री पाऊस झाला. भंडारदरा 7, घाटघर 7, पांजरे 4, रतनवाडी 4, वाकी 5 मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सध्या भंडारदरा धरणात 10776 दलघफू पाणीसाठा आहे.

मंगळवारपासून थंडी पुन्हा परतणार

पावसामुळे थंडी ओसरली असलीतरी येत्या मंगळवारपासून (12 जानेवारी) थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यात विजेच्या गर्जनेसह येत्या तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.