अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील भात शेतीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अवकृपा केल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.

अतिशय कष्टाने पिकवलेल्या पिकांची डोळ्यादेखत झालेली बर्बादी बघून शेतकर्‍यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तराळले होते. हाती आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी राजा हिरमुसला आहे. भात हे या भागातील मुख्य पीक असल्याने या पिकाकडे शेतकरी विशेष लक्ष देऊन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. ढोर मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास अशाप्रकारे हिरावून घेतल्यानंतर गावोगावी अत्यंत दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू हंगामात पावसाने मोठी दडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भात लागवड उशिरा झाल्याने यंदा हंगाम संपण्यास उशीर लागत होता.

उशिरा येणारे भात वाणांची कापणी अद्यापही सुरू होती. सुमारे पन्नास टक्के क्षेत्रावरील भात कापणी अद्यापही बाकी होती. या सर्वांवर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याने अक्षरशः कापणी केलेले भात पाण्यात तरंगत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जागोजागी शेतकर्‍यांनी तयार केलेली खळे पाण्यात डुंबून गेले आहेत. गावोगावी नैराश्याचे वातावरण असून यातून बाहेर येण्यासाठी गरीब शेतकर्‍यांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. सरकारकडून गावोगावी नुकसानीची पाहणी व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

तालुक्यातील खिरविरे, एकदरे, जाईनावाडी, पिंपळदरावाडी, कोकणवाडी, बिताका, शिवाजीनगर, तिरडे, पाचपट्टा, शिवाजीनगर, देवगाव, लाडगाव, टिटवी, वाकी, चिचोंडी, वारंघुशी, बारी, जहागीरदारवाडी यासह आजूबाजूच्या गावांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com