
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नेवासा तालुक्यातील पाचेगाव, कारवाडी व पुनतगावमध्ये गहू काढणी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने या भागात हजेरी लावल्याने बर्याच शेतकर्यांचे उभे गहू पीक आडवे झाले. त्यात पिकांचे मोठे नुकसान झाले.
या भागात गहू काढणीला अजून वेळ आहे. अनेक शेतकर्यांच्या गहू पिकांत हिरव्यागार गव्हाच्या ओंब्या आहेत. पण जर या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर मात्र उभे गहू पीक भुईसपाट होऊन गव्हाचा रंग उडून मार्केटमध्ये त्याला कवडीमोल भाव मिळेल. गहू पिकावर अवकाळी पावसाचा फटका बसू नये म्हणून शेतकरी आहे त्या परिस्थितीत गहू काढणी करून घेत आहे.
पावसाच्या धास्तीमुळे झटपट गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर होत आहे. शेतकर्यांना गव्हाच्या भुश्शाला मात्र त्यामुळे मुकावे लागत आहे. यंदा परिसरात गव्हाचे बर्यापैकी उत्पादन मिळत आहे. पण भावात देखील क्विंटलला जवळपास हजार ते अकराशे रुपयांची घसरण झालेली आहे. गहू पावसाने भिजले तर भावात आणखी घसरण होण्याच्या धास्तीने ओंबी ओली-हिरवी असतानाही शेतकरी गहू काढत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे पण शेतकर्यांना गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने या भागात नुकसान होऊनदेखील अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. तोच पुन्हा या भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला जात असताना शेतकरी फार मेटाकुटीला आला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन व गहू पिकांच्या दरात कायमस्वरूपी घसरण दिसून येत आहे.