अवकाळीच्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना 15 कोटी रुपयांची मदत - ना. विखे

शासन आपल्या दारी कार्यक्रमात ना. विखेंकडे निवेदनांचा पाऊस
अवकाळीच्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना 15 कोटी रुपयांची मदत - ना. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्य सरकारने सुरू केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 5 लाख 91 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.तसेच पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांना 15 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने देऊन दिलासा दिला असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

ना. विखे पाटील यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. निवेदनाद्वारे नागरिकांनी दिलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी अधिकार्‍यांना तातडीने सूचना देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. तसेच प्रधानमंत्री आवास योजना पथ विक्रेत्यांसाठी असलेल्या योजनेतील लाभार्थी व महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ना. विखे पाटील म्हणाले, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी शासन आपल्यादारी उपक्रम राज्यात सुरू आहे. नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन हे महाजनसंपर्क अभियान सुरू केले असून जिल्ह्याचा सर्वात मोठा कार्यक्रम शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या मंत्राने योजनांची यशस्वी अंमलबजावणी मागील नऊ वर्षात केली आहे. कोव्हीड संकट आपण सर्वानी अनुभवले. तेव्हापासून आज नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे.घरकुल योजना, आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा मिळत आहेत.आता राज्य सरकारने राज्यातील 12 कोटी नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला. राज्यात शेतकर्‍यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे.

शेतकर्‍यांवर कोणताही अर्थिक बोजा येऊ न देता या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून नगर जिल्ह्यात 5 लाख शेतकर्‍यांचा सहभाग या योजनेत नोंदला गेला आहे. तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाई पोटी शेतकर्‍यांना 15 कोटी आणि गारपीटीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 56 लाख रुपयांची मदत सरकारने दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या मनातील सरकार असल्याने सरकारकडून तसेच निर्णय होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे जाणून घेण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम असून, आमचे सरकार लोकांमध्ये जाऊन काम करणारे असल्याचा संदेश या माध्यमातून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. विखे पाटील यांनी काल अनेक नागरिकांचे अर्ज स्विकारले. शहरातील उत्सव मंगल कार्यालयात नागरिकांनी निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.प्रत्येक नागरिकांचा अर्ज स्विकारून प्रश्न समाजावून घेत त्यांनी अधिकार्‍यांना प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत सूचना केल्या.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, शरद नवले, केतन खोरे, विठ्ठल राऊत, संदीप चव्हाण, दत्ता जाधव, प्रांताधिकारी किरण सावंत, माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com