विनापरवाना कोविड हॉस्पिटल ; वडाळा ग्रामपंचायतीने मागितला खुलासा

विनापरवाना कोविड हॉस्पिटल ; वडाळा ग्रामपंचायतीने मागितला खुलासा

वडाळा बहिरोबा (वार्ताहर) - विनापरवाना कोविड हॉस्पीटल सुरु केले तसेच कोविड रुग्णांवर उपचारानंतरचा वैद्यकीय कचर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकला असा आरोप करुन वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीने एफजेएफएम हॉस्पीटल चालकांकडे दोन दिवसात खुलासा मागितला असून योग्य खुलासा न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, मराठी मिशन या सेवाभावी संस्थेच्या वडाळा बहिरोबा येथील एफजेएफएम रुग्णालयाने महिनाभरापूर्वीपासून कोविड रुग्णालय सुरु केले आहे. या कोविड रुग्णालयाशी संबंधित एका व्यक्तीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा गुन्हे अन्वेषण विभागाला वहिम आहे. यामुळे या रुग्णालयाचे प्रशासन वादात सापडले आहे.

नगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद केल्यानंतर कोविड रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या दि.15 मे रोजी पार पडलेल्या मासिक सभेत मिशन हॉस्पीटलने सुरु केलेल्या कोविड हॉस्पीटलबाबत चर्चा करण्यात आली. या मासिक सभेत संमत करण्यात आलेल्या ठराव क्र.6 नुसार मिशन हॉस्पीटलच्या वैद्यकिय अधिक्षकांना नोटीस काढून ग्रामपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता कोविड रुग्णालय कसे सुरु केले?, कोविड रुग्णालयात वापर करण्यात आलेला वैद्यकीय कचरा निष्काळजीपणाने उघड्यावर फेकून दिला. रुग्णालयात वापरण्यात येणार्‍या औषधांची यादी आहे काय? असे प्रश्‍न उपस्थित करुन करोना रुग्णांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आल्याकडे लक्ष वेधले आहे. या सर्व बाबींचा हॉस्पीटल व्यवस्थापनाने दोन दिवसांत खुलासा करावा, अन्यथा त्यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com