
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत-राशीन रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पिंपळवाडी येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रकाश भोसले (रा. पिंपळवाडी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले हे मोहटादेवी येथून दर्शनावरून आल्यानंतर पिंपळवाडी येथे दुचाकी वरून (क्रमांक एम एच 16, बी झेड 2188) घरी जात असताना कर्जत राशीन रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने समोरून प्रकाश भोसले यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढ्या जोरात होती की प्रकाश भोसले हे गंभीरित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ राशीन येथील रुग्णालयात नेण्यात आले होते.
मात्र उपचार सुरू असताना प्रकाश भोसले यांचे निधन झाले आहे. दरम्यान ज्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली तो वाहन चालक पळून गेला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विभाग त्या वाहनाचा शोध घेत आहे.