
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अज्ञात आजाराने एका शेतकर्याच्या तीन गाई दगावल्या असून तीन गायी अत्यवस्थ आहेत.
गेल्या चार दिवसापासून रांजणगाव देशमुख येथील कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकर्याच्या काही गाया आजारी पडण्यास सुरुवात झाली. आजारी गायी विषबाधा सदृश्य लक्षणे दाखवत आहेत. ही जनावरे उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. हळूहळू खालावून जाऊन मृत्यू पावत आहेत. दरम्यान बुधवारी या ठिकाणी नाशिक येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदीप झोड, डॉ. गिरीश पाटील तसेच नगर येथील जिल्हा पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. जालिंदर टिटमे व कोपरगावचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्या पथकाने पाहणी करून चारा, खाद्य व रक्ताचे नमुने घेतले असून ते नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत पोहेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अनंत साखरे होते. चार दिवसापासून या जनावरांवर अनेक वरिष्ठ पशुवैद्यक यांच्या देखरेखीखाली व सूचनेनुसार उपचार सुरू आहेत मात्र जनावरे उपचारांना प्रतिसाद देत नाही प्रथम दर्शनी चार्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे.तीन गाई दगावल्याने या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकर्यांनी जनावरांना चारा घालताना काळजी घ्यावी. शक्यतो वाळलेला चारा द्यावा. औषध फवारणी केलेला चारा देऊ नये. या जनावरांमध्ये प्रथमदर्शनी अन्न विषबाधेची लक्षणे दिसत आहेत.
- डॉ. अजयनाथ थोरे