पुणे विद्यापीठाचे खोटे लेटर पॅड वापरुन संगमनेरच्या भामट्याकडून युवकांची लूट

पुणे विद्यापीठाचे खोटे लेटर पॅड वापरुन संगमनेरच्या भामट्याकडून युवकांची लूट

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे खोटे लेटर पॅड वापरून संगमनेर येथील भामट्याने अनेक युवकांना आर्थिक गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. या भामट्याने चक्क विद्यापीठाच्या मेल आयडी वरून पत्रव्यवहार करून संबंधित युवकांना नोकरीस रुजू होण्याबाबत पत्र पाठविले आहे. शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाच्या नावाने असे गैरप्रकार सुरू असल्याने आता विद्यापीठ प्रशासन संबंधितावर काय कारवाई करणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्लर्क व शिपाई पदाची नोकरी लावून देतो असे सांगून संगमनेर येथील या भामट्याने युवकांना लाखो रुपयांना लुटले असल्याबाबतचे वृत्त काल दैनिक सार्वमतच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर फसलेल्या काही युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीची भेट घेऊन या भामट्याने नोकरी बाबत पाठवलेले कागदपत्रच सादर केले. या कागदपत्रामुळे शिक्षण क्षेत्रातला हा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

संगमनेर येथील भामट्याने काही काळ पुण्यात वास्तव्य केले. पुणे विद्यापीठात संपर्क वाढवून त्याने विद्यापीठातील काही कर्मचार्‍यांशी संधान साधले. पुणे विद्यापीठात आपले चांगले संपर्क असून आपण शिपाई व क्लर्क या पदावर नोकरी लावून देऊ शकतो असे त्याने अनेकांना सांगितले. नोकरी लावून देण्यासाठी एक ते दोन लाख रुपये लागतील. पैसे मिळताच पंधरा दिवसात नोकरीची हमी त्याने दिली. त्याच्या आमिषाला अनेक जण बळी पडले. अनेक युवकांकडून त्याने लाखो रुपये उकळले. पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने संतापलेल्या या युवकांनी त्याची भेट घेऊन त्याला जाब विचारला. तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

यानंतर त्याने अफलातून आयडिया शोधली. थेट पुणे विद्यापीठाचे खोटे लेटर पॅड वापरून युवकांना नोकरी मिळाले असल्याबाबतचे निरोप पाठवले. विद्यापीठाचे नोकरीचे पत्र आल्याने या युवकांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी तडक पुणे विद्यापीठ गाठले. संबंधित कार्यालय मध्ये हे पत्र दाखविले. मात्र विद्यापीठाकडून असे पत्र आम्ही दिले नसल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

या भामट्याने विद्यापीठाच्या लेटर पॅड वर संबंधित युवकांना ना हरकत प्रमाणपत्र ही पाठविली. या भामट्याने सर्व कागदपत्रे संगमनेर येथेच बनविले असल्याचे बोलले जात आहे. युवकांना पाठवलेल्या पत्रात निर्देशित केलेल्या व्यक्तीला सेवेत रुजू करुन घेण्यास कोणतीही हरकत किंवा बाकी नाही. तसेच त्या सर्वांची सेवेत रुजू करुन घेण्याची कार्यवाही ही दि. 15 डिसेंबर 2020 पूर्वी झालेली असून त्यांना रुजू करून घेण्याचा निर्णय विद्यापीठ अधिसभेच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे, असे या पत्राद्वारे म्हटले होते हे पत्र 20 पेक्षा अधिक युवकांना पाठविण्यात आले.

खोट्या लेटर पॅडवर सही शिक्क्यासह हे पत्र पाठवण्यात आलेले आहे. मात्र या पत्रावर विद्यापीठाचा जावक क्रमांक नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरील सही शिक्के त्याने कुठून मिळवले विद्यापीठाचे कोणते कर्मचारी या गैर व्यवहारात सहभागी आहे याचा शोध लावावा, असे फसवणूक झालेल्या युवकांनी म्हटले आहे.

दरम्यान संगमनेरच्या भामट्याने या युवकांकडून मिळवलेले पैशातून पुणे येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुण्याहून भाजीपाला खरेदी करून मुंबईला पाठवणे हा त्याचा व्यवसाय होता. मात्र या व्यवसायातही अपयश आल्याने त्याने थेट मुंबईला धूम ठोकली. मुंबई येथे एका राजकीय पक्षात त्याने प्रवेश केला. या पक्षाने त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी ही सोपवली आहे. पुणे विद्यापीठाने मोठे नाव कमावलेले आहे. या विद्यापीठाला कोणी बदनाम करत असेल तर विद्यापीठ प्रशासन त्याच्याविरुद्ध काय कारवाई करणार ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com