विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदित होतात - ना. भुसे

ना. भुसे, ना. तनपुरे, पोपटराव पवार यांनी केली विविध प्रकल्पांची पाहणी
विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदित होतात - ना. भुसे

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri Vidyapith

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन होऊन 52 वर्षे झाली आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान अनेक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले आहे.

सन 1995 साली बांबू लागवडीचे मिशन हे शेतकर्‍यांनी सुरू केले होते. विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर कृषी अवजारांची निर्मिती करणे गरजेचे आहे. शासन फळ लागवडीला प्रोत्साहन देत आहे. मात्र, उत्पादित फळांच्या मूल्यवर्धनावर भर देणे गरजेचे आहे.

विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदी होतात, हे विद्यापीठातील डाळिंब आणि ऊस संशोधनाने अधोरेखीत केलेले आह, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे काल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कुलगुरू डॉ.अशोक ढवण, राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, मोहन वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, विजय कोते, डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, रफिक नाईकवाडी, सुधाकर बोराळे, शिवाजी जगताप, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. आनंद सोळंके उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यापीठातील फॉरेज कॅक्टस प्रक्षेत्र, गो-संशोधन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, बांबू संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, कृषी अवजारे प्रकल्प, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान प्रकल्पास भेट दिली. यावेळी विविध प्रकल्पांना भेट देताना कृषी मंत्र्यांनी प्रक्षेत्रावरील मजुरांशी देखील संवाद साधला.

याप्रसंगी विद्यापीठाच्या पाणलोटक्षेत्र प्रकल्पाच्या भेटीच्या वेळी पोपटराव पवार माहिती देताना म्हणाले, विद्यापीठाच्या 953 हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प आदर्शवत असून या प्रकल्पाद्वारे 123 टी.सी.एम. पाण्याची साठवणूक जमिनीत झालेली आहे.

या प्रकल्पामुळे या प्रक्षेत्रावर कर्बाचे प्रमाण किती वाढले? मातीची सुपिकता, जमिनीची सुधारणा या संदर्भात अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प देशासाठी आदर्शवत प्रकल्प असून हा संपूर्ण देशात राबविणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ. सचिन नांदगुडे, प्रा. प्रसन्न सुराणा, डॉ. बाबासाहेब सिनारे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. विक्रम कड, डॉ. सुमती दिघे, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. अनिल काळे, प्रा. मंजाबापू गावडे आणि डॉ. अशोक वाळूंज यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com