जामखेड आगाराच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांकडून दगडफेक; कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

जामखेड आगाराच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांकडून दगडफेक; कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

जामखेड | तालुका प्रतिनिधी

एकीकडे एसटी. चा संप मिटविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना विध्नसंतोषी लोकांकडून त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहीसा प्रकार काल जामखेड आगाराच्या बस बाबत घडला आहे.

सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जामखेड अगाराची नगर-जामखेड बस क्रमांक एम एच ४० ए क्यू ६२२४ नगरहून जामखेडकडे येत असताना आष्टीजवळ गांधनवाडी फटा येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. बसवर दगडफेक करून हल्लेखोर पसार झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले. या दगडफेकीनंतर बसचालकाने बस आष्टी पोलिस ठाण्यात नेऊन तेथे फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जेष्ठ नेते शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या माध्यमातून काही मागण्या मान्य झाल्याने, चर्चा सकारात्मक होत असल्याने काही कर्मचारी कामावर हजर होत आहे. जामखेड आगारातही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांच्यामार्फत बससेवा सुरू करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भीती निर्माण करून संप चिघळविण्याचे प्रकारही सुरू असल्याचे दगडफेकीच्या घटनांवरून दिसून येते. याचा परिणाम कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांवर होत आहे.

जामखेड आगारातून सध्या ८ बस सुरू आहेत. मात्र, दगडफेकीच्या घटनेमुळे दहशत निर्माण होत आहे. सोमवार रात्रीच्या या घटनेचे पडसादही आज मंगळवारी पाहायला मिळाले. सकाळपासून जामखेड आगारातून केवळ १ बस बाहेर पडली आहे. हल्लेखोरांचा बंदोबस्त करून एसटीला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हजर झालेल्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com