राज्य शासनाने 20 पर्यटन महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. त्यात सह्याद्रीच्या कुशीत रंगणार्या निसर्गाची अद्भूत देण असलेला काजवा महोत्सवाचाही समावेश करण्यात आला. कसा असतो काजवा महोत्सव जाणून घेवूया...

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान भंडारदरा-घाटघर-कळसुबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची मायावी दुनिया अवतरते.कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुतखेल, कालठेंभे, भंडारदरा, चिचोंडी, बारी या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली जातात.

हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणांची का होईना वस्ती असते ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात.

गगनातील तारांगण जणू भुईवर उतरले. इथे रात्र चांदण्याची झाली असा आभास होतो. काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशात अद्भुत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळे नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो.

कुठंतरी एखाद्या झाडावर काजव्यांची लकेर दिसता दिसता विरून जाते. कुठं शेकोटीतल्या निखार्यांवरून ठिणग्या उसळाव्या तसे काजवे उसळतात.

रात्र चढता चढता काजव्यांच्या झुळकावर झुळका यायला लागतात. किर्र काळोख, डोक्यावर आभाळ, गार वारा..आसमंतातील नीरव शांतता...आणि काजव्यांची आतषबाजी, हा माहोलच काही और असतो.

रात्रीच्या राज्यातला काजव्यांचा दिमाख वेगळाच! दरीच्या काठावरून हा नजारा न्याहाळणे हा एक अविस्मरणीय आनंद. आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवण्यासारखा.

-PhotoStory - स्वप्निल शहा, भंडारदरा डॅम

मोबाईल नंबर-8805563415