गुरूजीच्या जागेवर सात वर्षांपासून बेरोजगार शिक्षकाकडून अध्यापन

गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन पानमंद यांचा प्रताप
गुरूजीच्या जागेवर सात वर्षांपासून बेरोजगार शिक्षकाकडून अध्यापन

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद यांनी त्यांच्या जागेवर एका बेरोजगार डीएड धारक शिक्षकाची बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या अनधिकृतपणे काम करणार्‍या तरूण शिक्षकांने सात वर्षांपासून पानमंद यांच्या जागेवर अध्यापनाचे करत असल्याचा जबाब गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे नोंदविला आहे.

गोरेश्वर पतसंस्थेचा कर्मचारी कुलदिप जाधव हा डीएड आहेत. शिक्षकाची नोकरी मिळत नसल्याचे त्याने गोरेश्वर पतसंस्थेत नोकरी स्विकारली. डीएड झालेला कर्मचारी मिळाल्यानंतर चेअरमन पानमंद यांची आयती सोय झाली. त्यांनी सात वर्षांपासून या कर्मचार्‍याचा वापर करून घेत याला त्यांच्या जागेवर अध्यापनास जाण्याची सक्ती केली. यात संबंधित शिक्षकाने पाच वर्षे डिकसळ येथील शाळेत तर दोन वर्षे मांजरधाव (हिवरे कोरडा) येथील शाळेत अध्यापनाचे काम केलेले आहे. तर चेअरमन पानमंद हे पतसंस्था व्यवस्थापन तसेच राजकारणात सक्रीय होते. मांजरधाव येथील वस्ती शाळेवर जाधव हा शिक्षक बेकायदेशीर अध्यापनाचे काम करीत असल्याची बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा अडसुळ यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली.

तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना 18 फेब्रुवारी 2022 निवेदन दिले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी त्यावर कार्यवाही झाली नव्हती. गावामध्ये बेकायदेशीर शिक्षकाची चर्चा रंगलेली असतांना एका ग्रामस्थाने 112 या पोलीस मदत केंद्राच्या नंबरवर फोन करून तक्रार दाखल केली. त्यानुसार पारनेर पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी शहानिशा केली असता, तेथे जाधव हा बेकायदेशीरपणे अध्यापन करत असल्याचे आढळून आले.

पोलीस कर्मचार्‍यांनी गटशिक्षणाधिकारी बुगे यांना घटनास्थळी पाचारण करून संबंधितावर कारवाईबाबत निर्णय घेण्यास सांगण्यात आले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आल्याचे पोलीस कर्मचारी जालिंदर लोंढे यांनी सांगितले. जाधव याने गटशिक्षणाधिकारी बुगे यांना दिलेल्या जबाबमध्ये गेल्या सात वर्षांपासून चेअरमन पानमंद यांच्या सांगण्यावरून पाच वर्षे डिकसळ येथील शाळेत तर दोन वर्षांपासून मांजरधाव येथील शाळेत अध्यापन करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात गटशिक्षणअधिकारी बुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

पतसंस्थेचा पगार अध्यापन शाळेत !

पतसंस्थेचा कर्मचारी म्हणून जाधव हा अध्यापन करीत होता. त्यास पतसंस्थेतूनच पगार देण्यात येत होता. जिल्हा परिषदेचा गलेलठ्ठ पगार मात्र पानमंद हे स्वतःच्या खिशात घालीत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. या गुन्हेगार शिक्षकाबरोबरच केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी या सर्वांना निंलबीत केले पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com