नाचून नव्हे तर वाचन करून उंदिरगावात 11 दिवस अनोख्या शिवजयंतीचे आयोजन

तालुक्यातच नव्हे तर राज्यात अनोख्या उपक्रमाचे स्वागत
नाचून नव्हे तर वाचन करून उंदिरगावात
11 दिवस अनोख्या शिवजयंतीचे आयोजन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्रभर वाजत-गाजत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु तालुक्यातील उंदिरगावने एक नवा पायंडा पाडत फक्त नाचूनच नाही तर वाचून शिवजयंती साजरी करण्याचा निश्चय केला आहे. या गावात सदर कार्यक्रम 8 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रोज रात्री गावातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

तालुक्याील उंदिरगावमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप आहे जो नेहमी सामाजिक कार्य करत असतो ‘उंदिरगाव ग्रामस्थ’ या ग्रुपचे नाव आहे. याच ग्रुपवर तीन महिन्याअगोदर एका मेंबरने शिवजयंती नुसती नाचून न साजरी करता वाचून करावी, असे मत मांडले, सर्वांना ते पटले.

याविषयी गेली तीन महिने बैठका घेण्यात आल्या. त्यात 11 दिवस श्रीमान योगी पुस्तक वाचण्याचे ठरले. वाचायला बसणार्‍यांची नाव नोंदणी झाली. पुस्तकाकरिता पैसे गोळा केले. पुण्यातील अप्पा बळवंत चौकात जाऊन पुस्तक खरेदी झाली. पुस्तक वाटले गेले.कार्यक्रमाची वेळ व ठिकाण ठरले. गावातील चौकात या कार्यक्रमाचे फ्लेक्स लावण्यात आले. कुठल्याही वर्गणीशिवाय कार्यक्रम करायचे असे आयोजकांनी पहिल्याच दिवशी जाहीर केले. फक्त वाचन करून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्याचा मानस ठेवून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

या कार्यक्रमाने गावातील ग्रामस्थ इतके खुश झाले आहेत की ते स्वतः होऊन या मुलांना रोज मंदिरात प्रसाद देत आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्ये असे की, रात्री 7 ते 8.30 वाचन केले जाते. शेवटी मंदिरात आरती केली जाते. या आरतीला सर्व जातीधर्म व पंथाचे 10 ते 12 जोडपे रोज आरतीला उपस्थित असतात.

उंदिरगाव येथे हनुमान मंदिर व मस्जिद जवळजवळ आहे. उंदिरगाव हे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. युवा पिढीने देखील ही बाब जपली आहे.वाचन सुरू असताना अजानसाठी रोज वाचन बंद ठेवून शिवरायांनी दिलेली सर्वधर्म समभावाची शिकवण तंतोतंत पाळली जाते.

संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात अशाप्रकारे शिवजयंती साजरी करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. कार्यक्रमाचे फ्लेक्सचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवर ठेऊन तालुक्यातील सुमारे 1500 लोकांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. राज्यभरातून या उपक्रमाचे सोशल मीडियावरून कौतुक केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com