
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उंदीरगाव येथे जागेसंबंधीची खाजगी मालकाची नोंद रद्द करून तेथे मंदिराचे नाव लावावे, अशा मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर चौकशी केली असता जो फेरफार रद्द करण्याची मागणी केली तो फेरफार नसून मालमत्ता क्रमांक असल्याची बाब ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांंना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सदर नोंद चुकीची असून उतार्यावरून गलांडे यांचे नाव कमी करावे व मारुती मंदिराचे नाव लावावे अशी मागणी भाजपाचे अनिल भनगडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगून त्यांनी या प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी ग्रामपंचातीकडे याजागेबाबत माहिती मागविली असता ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी कळविण्यात आले आहे.
याबाबत ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकार्यांना दिलेल्या लेखी उंदीरगाव येथे गट नंबर 851 मध्ये नानासाहेब गलांडे यांची मिळकत आहे. तेथे जुन्या मारुती मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. संबंधित जागा गलांडे यांच्या मालकीची असून भोगवटादार सदरी मारुती मंदिराची नोंद आहे.
भनगडे यांनी 1362 क्रमांकाचा फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे मात्र तो क्रमांक फेरफार नसून आठ अ सदरी मिळकत क्रमांक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले.
दरम्यान, मूळ जमीन मालक नानासाहेब गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मिळकत त्यांची वडीलोपार्जित आहे. त्यांच्या वडिलांनी मंदिराची जागा मंदिरासाठी दिली व तेथे मंदिरही बांधले. दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले. लोकवर्गणीतून काम सुरू झाले मात्र ते अपूर्ण राहिले.
काम पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यास माझी हरकत नाही. मात्र काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने वर्गणी करून त्याचा अपहार केला. याची तक्रार मी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. यासंबंधी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामार्फत चौकशी सुरू असून या चौकशीतून सत्य समोर येण्याच्या भीतीने काही लोक ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप गलांडे यांनी केला आहे.