
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहराच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणार्या मलनिःस्सारण व सांडपाणी व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण भुयारी गटार योजनेच्या 132 कोटी रुपये कामास शासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्याची माहिती राहुरीच्या विकास मंडळाचे अध्यक्ष व नगरपरिषद परिवर्तन आघाडीचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दिली.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना तनपुरे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खासदार सुजय विखे यांच्या पाठपुराव्यातून राहुरी शहरासाठी या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. शहराचे ओपन ड्रेनेज सिस्टीम व सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था उपचार व विल्हेवाट नाही. त्यामुळे उघड्या नाल्यांमुळे अस्वच्छता व वातावरणात दुर्गंधी पसरत असून डास व कीटकांमुळे गंभीर साथीचे रोग पसरत आहेत.
शिवाय उघड्या नाल्यांचा विसर्ग नदीपात्रात जात असल्याने नदीच्या पाण्यात प्रदूषण होत आहे. यासाठी भूमिगत गटार योजना हा सर्वोत्तम पर्याय लक्षात घेऊन ना. विखे, कर्डिले व खा. विखे यांच्याकडे आग्रह धरल्यानंतर शहरासाठी जवळपास 104 किलोमीटर ही पाईपलाईन फिरणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरासाठी 90 कोटींच्या आसपास निधी मिळणार असून त्यानंतरच्या मळा हद्दीतील टप्प्यासाठी 42 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. या योजनेचा आराखडा करताना शहराची सन 2053 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसार योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
या योजनेतून शहरातील तिळेश्वर मंदिर येथे एक टाकी तर मुळानदी काठावरील नगर परिषदेच्या जागेत स्वतंत्र विहीर घेऊन त्यात हे सर्व पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया करून पूर्ण शुद्ध पाणीच नदीत सोडले जाईल. यासाठी सोलर पंपाची सुविधा देण्याचे प्रस्तावात विचाराधीन आहे. यामुळे नगर परिषदेवर वीज बिलाचा ताण येणार नाही व पर्यायाने नागरिकांवर भुर्दंड येणार नाही. या योजने अंतर्गत मुख्य पाईपलाईन पर्यंत प्रत्येक घरातून येणार्या पाण्यासाठी होणारा खर्च संबंधित निविदाधारक करणार आहेत. याचे काम होताना रस्त्याच्या तुटफुटीसाठी रस्ते पुनर्बांधणीचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सतत नाशिक, मुंबई, नगर आदी ठिकाणी विविध अधिकार्यांना भेटून पाठपुरावा केला आहे.
या योजनेचे डीपीआर बनवण्याचे काम औरंगाबाद येथील कंपनीकडून करून घेण्यात आले आहे. नगरपरिषद यासाठी एक टक्के प्रमाणे एक कोटी 32 लाख रुपये टीडीएस भरणा कर्मप्राप्त असताना आपल्या नगर परिषदेची अडचण लक्षात घेऊन पहिला हप्ता 20 लाख रुपये भरून या रकमेचे विशेष बाब म्हणून पाच हप्ते करून देण्यात आलेले आहेत. प्रशासकीय मान्यतेसाठी आपण स्वतः लगेचच उद्यापासून प्रयत्न सुरू करून येत्या आठ ते पंधरा दिवसांत मान्यता मिळवून या मोठ्या कामाचे टेंडर निघण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी रावसाहेब तनपुरे यांनी दिली.
या योजनेसाठी कार्यकारी अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, मुख्य अभियंता एस. बी भुजबळ, मुंबई सदस्य सचिव अभिषेक कृष्णा आदी अधिकारी यांची विशेष मदत झाल्याचा उल्लेख श्री. तनपुरे यांनी आवर्जून केला.
यावेळी शिवाजीराव सोनवणे, भैय्यासाहेब शेळके, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, धीरज पानसंबळ, डॉ. संजय भळगट, डॉ. धनंजय मेहत्रे, दीपक मेहेत्रे, दिलीप राका, भाऊसाहेब काकडे, प्रदीप भुजाडी, शिवाजीराव डौले, ऋषिकेश तनपुरे, नारायण धोंगडे, अरुण साळवे, आर. आर तनपुरे, सोन्याबापू जगधने, अरुण साळवे, सुनील पवार आदींसह विकास मंडळाचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. योजना मंजुरीसाठी प्रयत्न केल्याबद्दल नामदार विखे, माजी मंत्री कर्डिले व सुजय विखे यांचे परिवर्तन आघाडीच्या वतीने आभार व्यक्त केले.
नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीपद आपल्याकडे असताना केवळ पाठपुरावा न केल्याने अमृत 2 योजनेत आपली योजना आली नाही. राज्यातील 192 नगरपालिका यामध्ये आल्याने त्यांना केंद्राचा जवळपास 45 टक्के निधी या योजनेसाठी मिळाला. परंतु केवळ आपल्या दुर्लक्षामुळे सत्ता असूनही आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही अशी खंत रावसाहेब चाचा तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केली.