अनधिकृत पोलीस चौक्यांबाबत कारवाई करा
सार्वमत

अनधिकृत पोलीस चौक्यांबाबत कारवाई करा

श्रीरामपूर काँग्रेसची मागणी

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अनधिकृतरित्या उभारलेल्या पोलीस चौक्यांबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून आऊटपोस्ट पोलीस चौक्या मंजूर आहेत. त्यामध्ये पढेगाव, कारेगाव, निमगावखैरी, अशोकनगर फाटा आशा अनेक पोलीस चौक्या मंजूर आहेत; परंतु त्यांना कार्यालय नाहीत. सदरच्या मंजूर असलेल्या आऊटपोस्ट पोलीस चौक्यांबाबत आ. लहु कानडे यांनी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेत पोलीस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला दिलेली होती.

असे असताना नजीकच्या काळात काही विशिष्ट पक्षातील राजकीय लोकांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सदरच्या पोलीस चौक्यांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. लहु कानडे यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आले. करोनामुळे चालू असलेल्या शासकीय नियमांचे उल्लंघन करत पोलीस प्रशासन, काही अधिकारी व राजकीय कार्यकर्त्यांनी शासकीय नियमांची पायमल्ली केली आहे.

त्यामुळे झालेली घटना ही निंदनीय असून सदर घटनेचा श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात येत असून सदर प्रकरणात शासकीय नियमांचे उल्लंघन करण्यार्‍या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांनी निवेदनानुसार योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.सदरच्या निवेदनावर ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, करण ससाणे, सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, विष्णुपंत खंडागळे, रमेश आव्हाड, रावसाहेब पवार, राजेंद्र औताडे, विलास दरेकर आदींच्या सह्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com