विनाअनुदानित शिक्षकांसाठी 1160 कोटींचा निधी

आ. डॉ. तांबे यांच्या पाठपुरावा
विनाअनुदानित शिक्षकांसाठी 1160 कोटींचा निधी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महाराष्ट्रातील शाळा व शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर विविध शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात सहभाग घेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधानभवनासमोर केलेल्या आंदोलनाला व सातत्याने या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाराष्ट्र सरकारकडून विनाअनुदानित शिक्षकांसाठी 1160 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे.

याबाबत आ. डॉ. तांबे म्हणाले, शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. 2012- 13 च्या सर्व वर्ग तुकड्यांना 100 टक्के अनुदान लागू करावे. अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना निधीसह घोषित करणे. यांसह त्रुटीपात्र शिक्षकांवर जो मोठा अन्याय झाला आहे. त्यांना एक महिन्यामध्ये निर्णय देऊन त्यांना पात्र घोषित करणे याचबरोबर ज्या शाळांना 20 टक्के अनुदान आहे त्यांना 40 टक्के, 40 टक्के अनुदान आहे त्यांना 60 टक्के अनुदानाचा टप्पा द्यावा यासाठीही आपण सरकारकडे आग्रह धरला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे असून यासाठीचा अध्यादेश शासनाकडून लवकर पारित व्हावा तसेच अधिवेशनामध्ये याबाबत तरतूद करावी अशी आग्रही मागणी ही आपण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील उर्वरित जे प्रश्न आहेत. त्यामध्ये विशेषतः ज्युनिअर कॉलेजची वाढीव पदे आयटी विषयाची पदे याबाबतही शालेय शिक्षण मंत्री यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली असून हे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली असल्याचे आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com