उंबरे (वार्ताहर) -

राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्या उंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड करण्यासाठी काल सोमवारी (दि.15) ग्रामपंचायत कार्यालयात बैठक

आयोजित करण्यात आली. सरपंचपदाच्या आरक्षणावर एकमेव दावेदार असलेल्या सुरेश दत्तू साबळे या अनुसूचित जमातीच्या सदस्यांनी सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी आपला अर्ज सकाळी 11 वाजता दाखल केला. परंतु या बैठकीसाठी 15 सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित असल्यामुळे ही बैठक कोरमअभावी रद्द करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी. के. मंडलिक यांनी दिली.

कोरम पूर्ण नसल्याने सरपंचपदाची निवड झाली नाही. त्यामुळे आरक्षणवर्गातील समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. काही राजकारण्यांनी आमच्या समाजाला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवले असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थी समाजात उमटल्या आहेत.

दरम्यान, काल कोरमअभावी रद्द झालेली सरपंचपदाची निवड आज मंगळवारी होणार असून यासाठी कोरमची आवश्यकता नसल्याचे प्रशासनााकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उंबरे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे आणि माजी संचालक सुनील आडसुरे, नवनाथ ढोकणे यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी गटाचे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या होत्या. नियमाप्रमाणे सरपंच, उपसरपंच निवड जाहीर झाली होती. परंतु या जागेवर आरक्षणाच्या वेळी अनुसूचित जमातीच्या महिलेचे आरक्षण घोषित झाले होते. परंतु सरपंच निवडीच्या दिवशी या जागेवर महिला निवडून न आल्यामुळे ही जागा रिक्तच राहिली. त्यावेळी उपसरपंचांची निवड करण्यात आली.

साहेबराव दुशिंग गटाचा उपसरपंच करण्यात आला. नंतर पुन्हा राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी पुन्हा सरपंचपदाच्या आरक्षणाची घोषणा केली. या जागेवर ढोकणे अडसुरे गटाचा अनुसूचित जमातीचा पुरुष निवडून आल्यामुळे ही जागा पुरुषासाठी जाहीर करण्यात आली. नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचपद निवडीची बैठक आयोजित करण्यात आली.

परंतु विरोधी गटाने खेळी करून सरपंचपदाची निवड हाणून पाडली. परंतु गावच्या विकास कामाबाबत ही महत्वाची निवड होती. सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. परंतु राजकीय खेळी करण्यात विरोधी गट यशस्वी झाला. विशेष म्हणजे विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य सारिका ढोकणे या ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी उपस्थित राहिल्या. त्या म्हणाल्या, गावच्या विकास कामासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे राजकारण आणणार नाही. त्यामुळेच मी या बैठकीसाठी उपस्थित आहे.

सरपंचपदाची निवड रद्द झाल्यानंतर हीच निवड आज मंगळवार दि. 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होणार असून या निवडीसाठी कोरमची आवश्यकता नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी. के. मंडलिक यांनी दिली.

उंबरे गावामध्ये विकास कामासाठी सर्वजण एकत्र येत असतात. परंतु सरपंचपदासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जमातीचा पुरुष जाहीर करण्यात आला. खरतर या जमातीला पहिल्यांदाच उंबरे गावांमध्ये सरपंचपद मिळत असून हे विरोधकांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी जाणून बुजून या समाजावर अन्याय करून बैठकीला दांडी मारली. त्यामुळे या समाजातील नागरिकांचे मन दुखावले गेले असल्याचे मत डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे यांनी व्यक्त केले.