उंबरी बाळापूर सेवा सोसायटी बिनविरोध निवडणूक संशयाच्या भोवर्‍यात

अधिकृत उमेदवाराचा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप
उंबरी बाळापूर सेवा सोसायटी बिनविरोध निवडणूक संशयाच्या भोवर्‍यात

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा उंबरी बाळापूर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रीया नुकतीच बिनविरोध झाली होती. मात्र, या निवडणूक प्रक्रीयेत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार बाळकृष्ण सुखदेव उंबरकर यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलाच नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झालीचं कशी असा प्रश्न उपस्थित करत. या सर्व निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत सहकार न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हणत निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्याकडे अर्ज दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाल्याने ही निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

याबाबत अधिकृत उमेदवार बाळकृष्ण सुखदेव उंबरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्याकडे दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, मी उंबरी बाळापूर येथील रहिवासी असून मी अपंग असल्याने मला आधाराशिवाय इतत्र जाता येत नाही. उंबरी बाळापूर सेवा संस्थेच्या 2022-27 या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत मी इतर मागास प्रवर्गातून उमेदवारी अर्ज सूचक सरुनाथ सुखदेव उंबरकर यांच्यामार्फत डी. डी. आर. कार्यालयात दाखल केला होता.

माझी निवडणूक लढण्याची इच्छा असल्याने 4 मे म्हणजे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मी संगमनेर येथे गेलो नसल्याने मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातून माझी उमेदवारी कायम होती. याचवेळी संभाजी तुळशीराम म्हस्के यांचाही सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज कायम होता. परंतु संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संभाजी म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज 5 मे रोजी बेकायदेशीररित्या मागे घेण्यात आला. त्यामुळे संस्था बिनविरोध करण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक नियमाचे उल्लंघन करत बोगस व बेकायदेशीर प्रक्रिया राबवून माझा ही उमेदवारी अर्ज बेकायदेशीर पणे माघार घेतल्याचे दाखवून मला निवडणूक प्रक्रियेतून प्रावृत्त करत माझ्या हक्क व अधिकारावर गदा आणल्या गंभीर आरोप केला.

5 मे रोजी चिन्ह वाटपाचा निवडणूक कार्यक्रम असल्याने मला वेळेत उपस्थित राहता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या अधिकारात ठराविक वेळेनतंरही चिन्ह देऊन टाकतात. मला देखिल चिन्ह दिले असेल असा माझा विश्वास होता. परंतु 13 मे रोजी माझे मित्र विकास गायकवाड यांना डी. डी. आर. कार्यालयात पाठवले असता निवडणूक निर्णय अधिकारी त्याठिकाणी हजर नव्हते.

तीन दिवसांपूर्वी गावामध्ये फटाके व विविध वाद्य वाजण्याचा आवाज झाल्याने मी माहिती घेतली असता संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे कळाल्याने मला धक्का बसला. मी अधिकृत उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध झाली कशी? राजकीय दबावाला बळी पडत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मला अंधारात ठेवून माझ्या उमेदवारी अर्जात काही तरी काळेबेरे करत माघार दाखवून सहकारी संस्था 13-0 अशी बिनविरोध केल्याचा आरोप बाळकृष्ण उंबरकर यानी अर्जाद्वारे केला आहे.

तसेच चार दिवसांपूर्वी सहकारी सेवा सोसायटी 13-0 अशी बिनविरोध झाल्याचे म्हणत विजयी उमेदवाराचे अभिनंदन करणारी पोस्ट फेटे बांधलेले फोटो समाज माध्यमात टाकण्यात आले होते. त्यामुळे मी माघार घेतली नसल्यामुळे निवडणूक घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित निवडणूक ही बेकायदेशीर व बोगस असल्याने उंबरकर यांनी हरकत घेऊन निवडणूक घेण्याची मागणी केली. तर संबंधित निवडणूक अधिकारी व उमेदवाराविरुध्द सहकार न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com