
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उंबरगाव येथे ‘तुम्ही उतार्यामध्ये फेरबदल का केला’, असे म्हणत ग्रामसेवकाला बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर पंचायत समितीद्वारा ग्रामसेवक म्हणून तालुक्यातील उंबरगाव येथील हितेश सुधाकर ढुमणे हे पंचायत समिती श्रीरामपूर येथे ग्रामसेवक असून त्यांना सध्या उंबरगाव येथे अतिरिक्त कारभार देण्यात आला. आहे. काल दि. 17 फेब्रुवारी रोजी ढुमणे हे उंबरगाव ग्रामपंचायतमध्ये असताना दुपारी 12 च्या सुमारास संगिता महेश खिलारी आणि त्यांचा मुलगा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले.
त्यांनी ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा आणून त्यासंदर्भात ढुमणे यांना माहिती विचारली. त्यावेळी ढुमणे खुर्चीवर बसून असेसमेंट रजिस्टर दाखवत असताना तेथे संगिता खिलारी हिचा नवरा महेश पंढरीनाथ खिलारी हा आला आणि तुम्ही उतार्यामध्ये फेरबदल का केला? असे विचारत वाईट वाईट शिवीगाळ करू लागला. तसेच ढुमणे यांची गचांडी पकडून तुला गावात राहू देणार नाही, तुला मारून टाकील, अशी धमकी देत त्यांच्या तोंडावर बुक्का मारला. संगितानेही शर्ट ओढून मारहाण केली.
ही मारहाण सुरु असताना ग्रामपंचायत शिपाई, संगणक परिचालक हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी केली. तेव्हा दुमणे हे घाबरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर पळाले असता महेश खिलारी याने पाठीमागून पळत येवून त्यांच्या डोक्यात अर्धवट विटाचा तुकडा मारला. त्यावेळी आरडाओरडा झाल्याने कामगार तलाठी थोरात. कोतवाल शिरोळे यांनी धावत येवून दुमणे यांना तलाठी कार्यालयात नेवून बसवले असता तेथेही संगिता खिलारी हिने आतमध्ये येवून गचांडी पकडून मारहाण करत असताना महेश खिलारी याने दुमणे यांच्या नाजूक भागावर दोन लाथा मारल्या आणि तू परत गावात दिसला तर तुला मारून टाकील, अशी धमकी दिली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक पडून नुकसान झाले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हितेश सुधाकर ढुमणे (वय 35) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संगिता महेश खिलारी व महेश पंढरीनाथ खिलारी, दोघे रा. उंबरगाव यांच्याविरोधात भादंवि कलम 332, 353, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.