उंबरेत मळगंगा सेंटरवर अधिकार्‍यांचा छापा

पावणेतीन लाखाची पावणे तीन हजार किलो पावडर जप्त
file photo
file photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

अहमदनगर येथील अन्न औषध प्रशासनाने राहुरी तालुक्यातील उंबरे येथील मळगंगा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीची तपासणी केली.

यावेळी दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी 2 लाख 64 हजार चारशे सोळा रुपये किंमतीची 2 हजार 796 किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळ चालू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान, या धाडीमुळे अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

गोपनीयरित्या मिळालेल्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाचे सहआयुक्त सी. डी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुठे, एस. एम. पवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे.

उंबरे येथील मिल्क कंपनीत व्हे पावडर साठवून ठेवल्या बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीनुसार एस. पी. शिंदे यांच्या पथकाने कंपनीचे कार्यालय व परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी कार्यालयात व्हे पावडरच्या 96 व शेतात सोळा गोण्या आढळून आल्या.

याबाबत पथकातील अधिकार्‍यांनी राजेंद्र नामदेव ढोकणे यांना या पावडरबाबत विचारले असता त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. ही पावडर दुधात भेसळीसाठी वापरली जात असल्याच्या संशयावरून पथकाने पावडरचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करून सील केला आहे. ही पावडर कशासाठी वापरली जात होती? मिल्क कंपनीत तिचा साठा कशाकरिता केला जात होता? याबाबतची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com