
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने चोर्यांचे प्रमाण वाढत चालल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित न्याय न दिल्यास पोलीस खात्यावरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा उंबरे येथील शेतकर्यांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, मोकळ ओहळ, चेडगाव या गावातील शेतकर्यांच्या 100 च्या वर विद्युत मोटार केबल स्टार्टर, चापकटर, जनरेटरच्या चोर्या होऊनही त्याचा अद्याप तपास न लागल्याने संतप्त शेतकर्यांनी उंबरे येथे आज आपल्या व्यथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समोर मांडल्या. यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, सरपंच सुरेश साबळे, माजी संचालक साहेबराव दुशिंग, माजी संचालक सुनील अडसुरे, किसनराव पटारे, गोरक्षनाथ देवरे, अशोक ढोकणे, नामदेवराव म्हसे, भाऊसाहेब व्यवहारे आदिंसह प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले, पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसून पोलिसांच्या संगनमताने अशा घटना घडत आहेत. तालुक्यात पोलिसांची संख्या अपुरी आहे. गावे 96 तर पोलीस अवघे 40 आहेत. पेट्रोलिंगसाठी स्वतंत्र गाडी नाही. अशा अनेक समस्या जरी असल्या तरी पोलिसांनी यात लक्ष देऊन तपास लावला पाहिजे.
शेतकरी आधीच आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यात अतिवृष्टीची मदत देण्याबाबत शासन पालकमंत्री तारखेवर तारखा देत आहे. पण ती मदत अद्याप मिळत नाही. मदत मिळण्यासाठी उपस्थित डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांनी आपल्या पाहुण्यांकडे आग्रह धरावा, असे तनपुरे यांनी सांगितले.
सुनील अडसुरे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून उंबरे व परिसरातील अनेक शेतकर्यांचे विहिरीवरील कालव्यावरील विद्युत मोटारी, केबल, बॉक्स, स्टार्टर चोरी होत आहे. उजव्या कालव्याला जेव्हा पाणी सुटते, तेव्हा शेतकरी आपल्या विद्युत मोटारी केबल आणून बसवितात व शेतीला पाणी घेतात. या मोटारी केबल कापून काही चोरटे चोरून नेत आहे. अशा घटना गेल्या अनेक महिन्यापासून विशेषतः नदी पात्रातील वाळू मुरूम वाहतूकीस बंदी आल्यापासून हे प्रकार वाढत चालले आहे.
बेकायदा वाळू, मुरूम वाहतूक बंद झाल्याने त्यांचे धंदे बंद झाल्याने ही मंडळी चोर्या-मार्या करण्याकडे वळले आहे. ही मंडळी व्यसनाधीन असल्याने चोर्या करण्याशिवाय दुसरा पर्याय न राहिल्याने हे प्रकार गेल्या 4 ते 5 महिन्यापासून वाढले आहे. याबाबत पोलिसांनी शेतकर्यांना लवकरात लवकर न्याय न दिल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता राहुरी-सोनई रस्ता रोको केला जाईल. यात सर्व पक्ष गट तट सहभागी होऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुनील अडसुरे यांनी दिला.
पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी पोलीस आपल्या बरोबर आहे. तुमच्या तक्रारीची तीव्र दखल घेतली असून तालुक्यातील विविध गावातील भंगार वाल्यांच्या दुकानावर धाडी टाकून त्यांची चौकशी सुरु केली आहे. गावागावातील चोरीचे सत्र थांबविण्यासाठी प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा पथक तैनात करावे, चोर्या-मार्या होऊ नये, यासाठी शेतकर्यांनी स्वतः लक्ष द्यावे, विद्युत पंपाला सेन्सर बसवून घ्यावे आदी सूचना करुन पोलिसांच्या व्यथा यावेळी मांडल्या.
बैठकीत अप्पासाहेब ढोकणे, भाऊराव ढोकणे, कुंडलिक ढोकणे, मच्छिंद्र ढोकणे, उत्तमराव ढोकणे, गंगाधर अडसुरे, भाऊ सासवडे, दिपक ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, बाळासाहेब हापसे सरपंच सुरेश साबळे, बाबुराव ढोकणे, गोपाळा कडू, विजय माळवदे यांनी सहभागी होऊन आपल्या तक्रारीचा पाढा वाचला.