
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उक्कलगाव येथे राहणार्या एका तरुण व्यावसायिकाने काल त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या व्यावसायिक पार्टनर असलेल्या मित्रांनी अपमानास्पद वागणूक देत पैशाची मागणी करत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा उल्लेख दिसून आला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
तालुक्यातील उक्कलगाव येथील गणेश गोरख थोरात (वय 35) याचे राहाता तालुक्यातील बाभळेश्वर या ठिकाणी राहाता तालुक्यातील राजुरी येथील विठ्ठल जिजाबा मोरे, व श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथी ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघचौरे यांच्या समवेत पार्टनरशिपमध्ये हॉटेल व्यवसाय करत होते. मात्र त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून हॉटेल व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीवरुन वाद होवू लागले. गणेश थोरात याच्याकडे अपमानास्पद वागणूक देत पैशाचा तगादा लावून वेळोवेळी पैशाची मागणी करत होते.
या जाचास कंटाळून गणेश गोरख थोरात याने काल पहाटेच्या सुमारास राहात्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून गणेशचा मृतदेह खाली उतरवून त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात पैशाचा तगादा करत मला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून राजुरी येथील विठ्ठल जिजाबा मोरे, व श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघचौरे या दोघांनी अपमानास्पद वागणूक देवून पैशाची मागणी करत त्रास दिल्याचे लिहिले होते.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रवींद्र गोरख थोरात यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 106/2023 प्रमाणे राजुरी येथील विठ्ठल जिजाबा मोरे, व श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथी ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघचौरे यांचेविरुध्द भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे करत आहेत.