श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या उक्कलगावच्या उपसरपंचपदी रोटेशनपध्दतीने

सौ.सुरेखा विकास थोरात यांची बिनविरोध वर्णी लागली असून सुरेखा थोरात या बाबा दिघे समर्थक विकास रामदास थोरात यांच्या पत्नी आहेत.

गत तीन वर्षांपुर्वी उक्कलगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांच्या जिवावर हरिहर एकता आघाडीची सत्ता येऊन प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून नितीन थोरात यांची वर्णी लागली होती.निवडून आलेल्या 10 सदस्यांमधून दरवर्षी रोटेशन पध्दतीने एका सदस्याला उपसरपंचपद देण्याचे ठरल्यानुसार चौथ्या टर्मला सुरेखा विकास थोरात यांची लॉटरी लागली असून जि.प.अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे व विद्यमान जि.प.सदस्या आशाताई दिघे यांच्या माध्यमातून विकास रामदास थोरात यांनी धनवाट रस्ता, लमाणबाबा रोड, खार्या नाल्यावरील बंधारे अशी विकास कामे गावात आणतानाच सर्वसामान्य जनतेची छोटी-मोठी कामे पदरमोड करून सातत्याने केली.

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य घटकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या याच कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पत्नीला उपसरपंचपदाची संधी दिल्याचे बोलले जात आहे. सुरेखा थोरात यांच्या निवडीनंतर जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी गत तीन वर्षांत तीन प्रभागात उपसरपंच पदाची संधी मिळालेली असताना परत प्रभाग दोन मध्ये उपसरपंचपद गेल्याने संधी न मिळालेले सत्ताधारी सदस्य नाराज झाले असून विशेषत: प्रभाग क्र.4 व प्रभाग क्र.5 ला ठेंगा दाखवला असल्याची प्रतिक्रिया काही सत्ताधारी सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे नोंदवली तर पटेलवाडीकडे फक्त वोट बँक म्हणून पाहिले जाते.

निवडणुकीनंतर जनता तर सोडाच पण या प्रभागातील सदस्यांनाही वार्यावर सोडले. पटेलवाडीतील बहुमजली घरकुलाचे स्वप्न तर दूरच पण पटेलवाडीच्या बोअरवेलचे पाणी धनवाटाला नेण्याचा घाट घातला जात असून त्यास विरोध केला जाईल असे एका सत्ताधारी सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याने सत्ताधारी मंडळाने यातून बोध घेण्याची गरज आहे.

दरम्यान या बिनविरोध निवडीप्रसंगी हरिहर एकता आघाडीचे अध्यक्ष रामु अण्णा थोरात, माजी सभापती आबासाहेब थोरात, सरपंच नितीन थोरात, सुनीलभाऊ थोरात,अनिल थोरात, सुरेश जगधने, विजू मोरे, आदिनाथ जगधने,रवींद्र जगधने,लक्ष्मण थोरात यांच्यासह माजी उपसरपंच शारदाताई जगधने, सुशिलाबाई थोरात, रवींद्र थोरात व ग्रा.पं.सदस्या विमल थोरात आदींसह निवडणूक निर्णय अधिकारी रमेश निबे व ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते

आपल्याला यावेळी संधी मिळेल,असे प्रभाग 4 व प्रभाग 5 मधील अनेक सदस्यांसह इतर प्रभागातील सत्ताधारी सदस्यांना वाटत होते .मात्र निवडीपुर्वी झालेल्या बैठकित सुरेखा थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने संधी न मिळालेल्या सदस्यांनी बैठकितून काढता पाय घेतला.