उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रोत्सव

दोन स्वतंत्र यात्रा कमेट्या
उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रोत्सव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांचा यात्रोत्सव गुढी पाडव्याच्या दिवशी सुरु होणार असून तीन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती दोन्हीही यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आलेली आहे.

एका यात्रा कमिटीच्यावतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बुधवार दि. 22 मार्च चैत्र शुद्ध 1 गुढीपाडवा या दिवशी सकाळी पुणतांबा येथून आणलेल्या पवित्र गंगाजल कावड मिरवणूक त्यानंतर श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांना उक्कलगाव ग्रामस्थांच्यावतीने गणवेश परिधान केला जाणार आहे. 11 वाजता गुढी पहाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजता डफ मिरवणूक होईल. सायंकाळी 8 ते 10 या वेळेत सालाबादप्रमाणे महंत उध्दव महाराज मंडलिक यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. गुरुवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आलेला आहे.

शुक्रवार दि. 24 मार्च रोजी 4 वा. कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजीत केला आहे. श्री हरिहर केशव गोविंद भगवान हे अतिशय जागृत देवस्थान आहे. दरवर्षी गुढी पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते. त्या यात्रेकरिता भाविक दुरदुरवरुन येत असतात तीन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रकाश नानासाहेब थोरात, उपाध्यक्ष रविंद्र किशोर थोरात, सचिव विकास रामदास थोरात, खजिनदार अनिल जनार्धन थोरात, यात्रा कमिटी व उक्कलगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

काल (मंगळवारी) दुसर्‍या गटाने स्वतंत्र बैठक घेऊन वेगळी यात्रा कमेटी जाहीर केली. यात अध्यक्ष म्हणून ज्ञानदेव वामन थोरात, उपाध्यक्ष किशोर जगदेव थोरात, सचिव दत्तात्रय गोरक्षनाथ कर्डिले तर खजिनदारपदी नंदकुमार रोहिदास थोरात यांची निवड करण्यात आली आहे.

या कमेटीच्यावतीने गंगेहून पायी आणलेल्या पाण्याची कावड मिरवणूक व स्वागत, सकाळी 10 वाजता गुढ्या पहाणे, सायंकाळी डफांचा फड व मानकर्‍यांचा यथोचित सन्मान, रात्री 7 ते 9 सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन, दि,23 मार्च रोजी भव्य बैलगाडा शर्यत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना तसे निमंत्रण शनिवार दि.11 मार्च रोजी 70 ते 80 ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.

यात्रोत्सवात सर्वच मान्यवर महाराज मंडळींना निमंत्रीत करून हा यात्रोत्सव भव्य-दिव्य करण्याचा मानस इंद्रनाथ थोरात यांनी बोलून दाखवला असून नवनियुक्त यात्रा कमेटी व देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असून, कोणत्याही परिस्थितीत यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडू, असा विश्वास त्यांनी दिला. दोन्ही महाराज पुजनीय असून दोघांनाही निमंत्रीत करून सन्मान करू असेही ते म्हणाले.

यात्रा कमेटीस सहकार्य करावे असे आवाहन सल्लागार मंडळातील संदीप थोरात, ईश्वर दरंदले, संजय जगधने, बाबू मोरे, मुकुंद जगधने, अरुण गोळे, विलास शिंदे, प्रदीप तांबे, इंद्रजीत मुसमाडे, बापूसाहेब थोरात, गोविंद अंत्रे, शफीक पठाण, भिमा रजपूत, सतीश फुलपगार यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com