उक्कलगावात सरपंचांच्या घरी धाडसी चोरी

दोन-तीन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न फसला
उक्कलगावात सरपंचांच्या घरी धाडसी चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यात दिवसेंदिवस चोर्‍यांचे सत्र सुरूच असून काल पहाटेच्या सुमारास तालुक्यातील उक्कलगाव-खंडाळा रोडवर राहत असलेले उक्कलगावचे सरपंच नितीन आबासाहेब थोरात यांच्या घरी तसेच अन्य दोन-तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

उक्कलगाव -खंडाळा रोडवर सरपंच नितीन थोरात यांचा बंगला असून काल पहाटे तीन ते सव्वा तीनच्या सुमारास त्यांच्या बंगल्याच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी रुमचे लॉक शिताफीने तोडले. सदर रुममध्ये त्यांची मुलगी खुशी झोपलेली होती.चोरट्यांनी तिच्या गळ्याला चाकू लावून तिला गप्प केले व त्याच खोलीत असलेली नितीन थोरात यांच्या आईची पेटी घेऊन पोबारा केला. बंगल्यापासून काही अंतरावरच पेटीची उचकापाचक करून मुद्देमाल घेऊन पेटी तेथेच सोडून चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच राहत असलेले किशोर दत्तात्रय थोरात यांच्या घराकडे वळवला.

तेथील कपाटाची उचकापाचक करीत फाईल्स व काही कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकली व तेथून तीन हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. तर शेजारीच राहत असलेले अशोक विठ्ठल थोरात यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या सूनबाई जाग्या झाल्याने तेथील चोरीचा प्रयत्न फसला. दोन ते तीन दिवसांपूर्वी अशोक भानुदास थोरात यांच्या वाकणवस्ती येथील शेतीवरून एसटीपी पंप मोटार व स्टॅण्डसह चोरून नेला आहे तर याच परिसरातून मुठे यांची केबल चोरीला गेली आहे.लक्ष्मण चिंधे यांच्या गाडीची बॅटरीही मुकुंद जगधने यांच्या बंगल्या समोरून चोरीला गेली आहे.

दरम्यान चोरीच्या घटनांची व्याप्ती पहाता या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची गरज असून ग्रामसुरक्षा यंत्रणाही सक्षमपणे कार्यान्वित करण्याची गरज आहे.घटनास्थळी बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके व भिंगारदे यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत. चोरटे संख्येने अधिक असावेत कारण सरपंचांच्या घरी ज्याठिकाणी चोरी झाली तेथे दाट लोकवस्ती असून शेजारी-पाजारी यांना याची यत्किंचीतही कल्पना आली नाही.

यावरून चोरटे सराईत असावेत असा अंदाज वर्तविला जात आहे. पाळत ठेवून हा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी अगदी वर्दळीच्या िंठकाणी हमरस्त्यावर हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लवकरात लवकर सदर घटनेचा तपास लावून भितीचे सावट दूर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com