ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उक्कलगावचा पारा वाढला

तिसरी आघाडी जोमात तर मागील आघाडी कोमात || समाजसेवा मंडळाचा सावध पवित्रा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उक्कलगावचा पारा वाढला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सजग आणि प्रतिष्ठेच्या उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत असून 16 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व हालचालींनी वेग घेतला असून तिसर्‍या आघाडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. ही आघाडी किती जागा लढवते किंबहुना किती उमेदवार या आघाडीला मिळतात यावर दुसर्‍या एका मंडळाचे गणित अवलंबून असून ग्रामस्थ मात्र या नाट्यमय घडामोडींकडे कुतुहलाने बघत आहेत.

दोन दिवसांपूर्वी करण ससाणे यांची भेट घेतल्यानंतर निवडणुकीत जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तिसर्‍या आघाडीची घोषणा करण्यात आली. तिसर्‍या आघाडीतील सर्व कार्यकर्ते पुर्वाश्रमीचे हरिहर एकता आघाडीचेच घटक असून सद्य स्थितीत हरिहर एकता आघाडीला नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आल्याचे समजतेे. तर समाजसेवा मंडळाने सावध पवित्रा घेत निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय घेतला असून काल नुकतीच यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांनी समाजसेवा मंडळाची भूमिका स्पष्ट करून निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची यामागील कारणमिमांसा केली. अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात यांची भुमिकाही स्पष्टपणे समोर येत नसल्याने लोकंही वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत असून तिसरी आघाडी यशस्वी झाल्यास तो उक्कलगावच्या राजकारणातला इतिहास ठरेल. विशेष म्हणजे माजी सभापती आबासाहेब थोरात हे आक्रमक समजले जातात. त्यांचे चिरंजीव नितीन थोरात हे प्रथम लोकनियुक्त सरपंच असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत पॅनल करणारच असे लोकं खाजगीत बोलत असून. हरिहर एकता आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग न घेता तिसरी आघाडी उदयास आल्याचे बोलले जात असून माघारीनंतर चित्र बदलेलं असा अनेक मतदारांचा अंदाज आहे. तसे झाल्यास तिसर्‍या आघाडीचे मनसुबे धुळीस मिळतील असे बोलले जाते. मात्र समाजसेवा मंडळाच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी कुणावरही दडपण न आणता सर्वसंमतीने उमेदवार देण्याची घोषणा केल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे.

दरम्यान एक दोन दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडण्याची शक्यता असून हरिहर एकता आघाडीच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. आज उद्या हरिहर एकता आघाडीच्या हालचाली गतीमान झाल्यास निवडणुकीतील रंगत वाढणार आहे हे मात्र नक्की.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com