उक्कलगावातील सेंट्रल बँकेला ध्वजारोहणाचा विसर

ग्रामस्थांत तिव्र असंतोष; आज शाखाधिकार्‍याला जाब विचारणार
उक्कलगावातील सेंट्रल बँकेला ध्वजारोहणाचा विसर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आणि घरोघर तिरंगा फडकवला जात असताना तालुक्यातील उक्कलगावच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मात्र 13 व 14 ऑगस्ट तर सोडाच पण 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही ध्वजारोहण न केल्याने ग्रामस्थांत तिव्र असंतोष पसरला आहे.

शासनाच्या ‘घर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तीन दिवस देशातील प्रत्येक घर, शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी आस्थापना यांना ध्वजारोहण करण्याचे अवगत केले होते. त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना व नियमावली यांचे परिपत्रकही संबंधितांना देण्यात आले होते. मात्र असे असताना उक्कलगावच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेने एकही दिवस ध्वजारोहण न करता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्राप्रती आपली किती निष्ठा आहे, हे प्रदर्शीत केले आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उक्कलगावात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना सेंट्रल बँकेच्या शाखेत ध्वजारोहण झाले नसल्याचे काही सुज्ञ ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी त्याक्षणी नोट कॅमेर्‍याद्वारे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला असता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.बघता बघता ही बातमी वार्‍यासारखी गावभर पसरल्याने अनेकांनी प्रत्यक्ष बँकेसमोर येत खातरजमा केली. विशेषत: तरुण वर्गाच्या भावना तिव्र असून सदर शाखेचे मॅनेजर राजस्थान येथील असल्याने दीर्घ सुट्ट्यांचे औचित्य साधून ते गावी गेले आहेत. ते बँकेत येताच हे तरुण आज त्यांना जाब विचारून लेखी घेणार आहेत.काही जबाबदार नागरिकांनी याची कल्पना तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिली असून त्यांनीही सदर प्रकाराबाबत शाखाधिकार्‍यांना विचारणा करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान सदर शाखाधिकारी परप्रांतीय असल्याने ते येथील ग्राहकांच्या भावना समजून घेत नाहीत व मनमानी पध्दतीने कामकाज करतात, अरेरावीची भाषा वापरतात अशीही तेथे जमलेल्या बहुसंख्य ग्रामस्थांची ओरड होती. त्यामुळे हे प्रकरण कोणते वळण घेते, सदर शाखाधिकार्‍यांवर कारवाई होणार का? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com