
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढताना दिसत असून उक्कलगाव व पटेलवाडी परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे वेगवेगळ्या घटनांवरून समोर आले आहे. हे बिबटे संख्येने किमान चार ते पाच तरी असावेत असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.
शुक्रवारी रात्री बिबट्याने बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाउंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून लगतच राहणार्या प्रतापराव पटारे यांच्या शेतापर्यंत ओढत नेले. दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरात वस्ती येथे विलास नानासाहेब थोरात यांना रात्रीच्या सुमारास घरामागील द्राक्ष बागेत बिबट्या दृष्टीपथास पडला. उक्कलगाव-खंडाळा रोडवरही काहींना दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिले.त्यामुळे बिबटे संख्येने अधिक असावेत या निष्कर्षाला दुजोरा मिळतो.
सध्या लोड शेडिंगमुळे वीजपुरवठा कमी होतो. त्यामुळे शेतकरी रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जातात. शेतात दबा धरून बसलेला बिबट्या कधीही त्यांच्यावर हल्ला करू शकतो. वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामे करतात, पिंजरे लावतात पण त्यात बिबट्या अडकेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे शेतात पाणी भरण्यासाठी जाताना टॉर्च, काठी व समुहाने जाणे गरजेचे असून सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा नाही त्यामुळे ते मानवी वस्तीकडे कूच करत आहेत. त्यामुळे लहान मुले व वृध्द व्यक्तिंनी रात्री घराबाहेर पडू नये. जसजसे उसाचे क्षेत्र तुटत जाईल तसतसा बिबट्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना घडण्याअगोदरच ग्रामस्थांनी सावध होण्याची गरज आहे.