उक्कलगावमध्ये 4 ठिकाणी बिबट्याचे हल्ले

2 बोकड आणि कुत्रे फस्त; नागरिकांमध्ये दहशत
File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बिबट्याच्या वारंवार होणार्‍या हल्ल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. उक्कलगावमध्ये चार ठिकाणी बिबट्याने हल्ले केले असून यात दोन बोकड आणि कुत्रे फस्त केले आहेत. येथीलच लम्हाणबाबा शिवारातील ज्ञानदेव देवराम चिंधे यांचा बोकड बिबट्याने गोठ्यातील जाळीतून उचलून नेत रक्त प्राशन करून फस्त केला असून परवा पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

सोसायटीचे संचालक सुनील भागवत थोरात यांच्या पोर्चमध्ये बसलेल्या इंग्लिश पाळीव कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले असून त्यांच्या मानेला अचानक धरल्यामुळे त्याला दात लागल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पटेलवाडी शिवारातील किशोर कर्डिले यांच्या बोकडावर बिबट्याने ताव मारून तेथील शिवारात आणखी एका कुत्र्याचा फडशा पाडला. तिनशे नाला येथे हरिणाच्या कळपाने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. रानडुक्करे मका पिकांचे नुकसान करत असून कोल्हे, हरिण, तरस हे प्राणी परिसरात आढळल्याने आणखी भीती निर्माण झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. उक्कलगावमध्ये बिबट्याची अचानक संख्या वाढली असल्याने वनविभागाचे कर्मचारी परिसरात बिबटे आणून सोडतात की काय? असा सवाल विचारला जात आहे.

सध्या गावात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त किर्तनासाठी पायी चाललेल्या महिलांना टॉवरजवळ बिबट्या आडवा गेल्याने यावेळी महिलांची चांगलीच धांदल उडाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com