
राहाता | प्रतिनिधी
महाराष्ट्रात पावसानं सुरुवातीच्या हजेरीनंतर ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या संगमनेर, पुणतांबा या भागातील बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी काकडी गावातील शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तसेच काही महिलांनी देखील उद्धव ठाकरेंना इथल्या समस्या सांगितल्या.
शेतकऱ्यांनी म्हटलं की, १८२ गावांमध्ये कुठेच पाणी नाही. सायाबीनचं पिक पूर्णपणे करपून गेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकारनं असताना इथल्या गावांसाठी १,००० कोटींचा निधी मिळाला होता. पण त्यानंतर काहाही मिळालेलं नाही. मजूरांना कामं नाहीत, जॉईन्ट खातं असल्यामुळं सरकारी मदतीचा काहीही फायदा मिळत नाही. त्याचबरोबर पिण्यासाठी देखील आम्हाला पाणी विकत घ्यावं लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ऊसही नाही, खाटिकही जनावरांना घेत नाही. गावात प्यायलाही पाणी नाही
तसेच काही महिलांनी देखील ठाकरेंना इथल्या समस्या सांगितल्या. त्यांनी सांगितलं की, आमच्या गावात विमानतळ झालं. हे विमानतळ येणार असल्यानं आम्हाला खूप आश्वासनं दिली गेली, त्यासाठी १५०० एकर जमीन कवडीमोल भावात घेतल्या. आमच्या गावात प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाही. आम्हाला जर तातडीनं कर मिळाला तर आम्ही गावात शाळा, लाईटची व्यवस्था करु शकतो. आम्ही मंत्रालयात जाऊन सर्व मंत्र्यांना निवेदनं दिली आहेत. ३० कोटी रुपये खर्चुन आमच्या गावात 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रम केला गेला. आमच्याच जमिनीवर उभं राहून कार्यक्रम केला पण आमची भेटही घेतली नाही, असा आरोपही यावेळी या महिलांनी केला. यावर विरोधीपक्ष नेते अंबादास विधीमंडळात आवाज उठवतील तसेच आपण रस्त्यावर आवाज उठवू यात मी स्वतः लक्ष घालेन असा दिलासा उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला.