ठाकरे सेना रस्त्यात... तर शिंदे सेना नियोजनात

मुंबईतील दसरा मेळाव्यांत घुमणार नगरचा आवाज
ठाकरे सेना रस्त्यात... तर शिंदे सेना नियोजनात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दसर्‍याच्या दिवशी मुंबईत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईतच बीकेसी मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात नगर जिल्ह्याचा आवाजही घुमणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ठाकरे सेनेने पायी मुंबई प्रवास सुरू केला असून, ते शुक्रवारी नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेजला पोहचले असून दुसरीकडे जिल्ह्यातील शिंदे सेनेने जिल्ह्यातून कितीजण न्यायचे याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबईतील दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन जोरात होत असताना त्यात नगर जिल्ह्याचाही बुलंद आवाज घुमणार आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 जणांना घेऊन बाहेर पडण्यास व त्यांनी भाजपसमवेत राज्यात सत्ता स्थापन करण्यास आता जवळपास तीन महिने होत आहेत. जूनमधील या राजकीय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले व नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून मुंबईतच काय, पण राज्यभरातील ठाकरे सेना व शिंदेसेना यांच्यातून विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे.

संधी मिळेल तेथे एकमेकांवर आरोप व एकमेकांना अडचणीत आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 5 ऑक्टोबरला या दोन्ही गटांचे मेळावे मुंबईत होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यांना उपस्थित राहणे प्रत्येकाला बंधनकारक झाले आहे. यानिमित्ताने आमच्यामागे कितीजण आहेत, याचे चित्र परस्परांना दाखवण्याचे नियोजन आहे. त्यामुळेच या रस्सीखेचीत नगर जिल्हाही मागे नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाची सूत्रे घेतल्यानंतर लगेच नगर जिल्ह्यातही शिवसेनेत भूकंप झाला व शिवसेनेतून अनेकजण शिंदेसेनेत डेरेदाखल झाले आहेत. ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी नगरला लगेच मेळावा घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे समर्थकांची शिवगर्जना सभा येथे झाली. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यावेळी उपस्थित होते.

त्याचवेळी शिंदेसेनेच्या दसरा मेळाव्यात नगर जिल्ह्यातून जोरदार शक्तीप्रदर्शन गरजेचे असल्याचे देसाईंनी सांगितल्याने त्याचे नियोजन शिंदे सेनेने सुरू केले आहे. तर, ठाकरे सेनेचे नगर जिल्ह्याच्या प्रमुखांनी मुंबईची पायी वारी पाच दिवसांपूर्वीच सुरू केली आहे. त्यांचे जिल्ह्यातील अन्य काही समर्थक 4 ऑक्टोबरला मुंबईला जाण्यास निघणार आहेत. मात्र, या घडामोडीत या दोन्ही गटांचे नेमके कितीजण मुंबईतील दोन्ही मेळाव्यांतून दिसणार, याची उत्सुकता मात्र जिल्ह्याच्या राजकारणात जोरात आहे.

ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मुंबईच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी 26 सप्टेंबरपासून मुंबई पायी पदयात्रा सुरू केली आहे. सुमारे दीडशेजण त्यांच्यासमवेत असल्याचे सांगतात. नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज जवळील मढ येथे गुरुवारी त्यांचा मुक्काम होता. त्यानंतर ते काल माळशेजला पोहोचले आहेत. प्रा. गाडे यांनी ठाकरे सेनेचे जिल्ह्यातील 10 हजारजण मुंबईच्या मेळाव्यात दिसतील, असा दावा केला तर तर दुसरीकडे शिंदेसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक सचिन जाधव यांनीही मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्यास नगर जिल्ह्यातून जास्तीतजास्त समर्थक उपस्थित राहण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com