संदीप रोडे| अहमदनगर

मोहमायेत गुरफटलेल्या पत्रकार बाळ ज. बोठेचा खरा चेहरा समोर आणण्याचे धाडस एसपी मनोज पाटील यांनी दाखविले. रेखा जरे पाटील हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अशी ओळख झालेल्या बोठेच्या काळ्याकृत्याचा सातबारा एसपी पाटील यांनी शोधलाय. मितभाषी, शांत अन् कायद्याच्या चाकोरीत शिस्तबद्ध काम करणारे एसपी पाटील यांच्या धडाकेबाज कारवाईने अनेक धेंडांना घाम फुटलाय !

एसपी पाटील जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच आले आहेत. या काळात त्यांनी क्राईमच्या अंगाने जिल्हा समजून घेतला, मात्र राजकीय व सामाजिक अंगाने जिल्ह्याचा अभ्यास सुरू असतानाच रेखा जरे पाटील मर्डर प्रकरण घडले. या गुन्ह्याचा तपास सुरू होताच प्रतिथयश पेपरचा कार्यकारी संपादक असलेल्या बाळ. ज. बोठेचे नाव चर्चेत आले.

त्यावेळी पाटील यांच्यावर दबाव येणार, दबावातून तपास वेगळ्याच दिशेने सरकेल, असे वाटत असतानाच पाटील यांनी बोठेचा समावेश आरोपींच्या यादीत करत नगरच्या पटलावर धक्कादायक बातमीचा बॉम्ब टाकला. विशेष म्हणजे अगोदर हातात सबळ पुरावे घेतले, त्यानंतर बोठेच सूत्रधार असं जाहीर करून टाकलं.

थंड डोक्याने केलेल्या सुपार मर्डरचा एसपी पाटील व त्यांच्या टीमने 18 तासातच छडा लावला. नव्हे तर खरा गुन्हेगार बोठेचे नावही समोर आणले. स्वत:ला वाचविण्यासाठी बोठे याने पाटील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाही मात्र त्या दबावाला न जुमानता पाटील यांनी त्याचे परदेशात पळून जाण्याचे रस्तेही बंद करण्याचे पाऊल उचलले.

आता बोठे कोठेही दडून बसला तरी त्याला पोलिसांसमोर शरण आल्याशिवाय गत्यंतर नाही अशा पध्दतीने कायद्याचे फासही एसपी पाटील यांनी आवळण्यास सुरूवात केलीय. बोठे व त्याने केलेल्या कृत्याचा भांडाफोड करण्याची तयारी एसपींनी सुरू केलीय. ही तयारी अनेकांना जेलची हवा खाणारी ठरू शकणार आहे.

एसपींची ही कारवाई ‘रियल हिरो’ करणारी ठरेल असे चिन्हे दिसू पाहताहेत. एसपी पाटील यांच्या हाती ‘नाजूक’ प्रकरण लागलेच आहे, तर आता त्याचा फर्दापाश करावाच अशीच जनतेची इच्छा आहे.