श्रीगोंदा | प्रतिनिधी

तालुक्यातील काष्टी येथील राष्ट्रीय महामार्ग नगर-दौंड रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अजय वाळूंज (२२) रा. टाकळी कडेवळीत ता.श्रीगोंदा व पवन योगेश खरात (१२) रा. काष्टी (खरातवाडी) ता.श्रीगोंदा अशी या मृतांची नावे असून घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि.८ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास नगर-दौंड महामार्गावर काष्टी गावाजवळील हाॕटेल शिवनेरी समोरअजय वाळूंज व पवन खरात या तरुणांनी श्रीगोंदा येथून कपडे खरेदी केले व काष्टीच्या दिशेने गाडीवर जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. महामार्ग काँक्रीट असल्याने त्यांना जोराचा मार लागला. अपघातानंतर धडक देणारे वाहन पळून गेले. अपघातात पवन खरात जागेवरच ठार झाला. तर अजय वाळूंज हा गंभीर जखमी असल्याने त्याला ताबडतोब उपचारासाठी दौंड येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

अपघातानंतर या तरुणांची ओळख पटेना. त्यातील एकाच्या शर्टच्या खिशात श्रीगोंदा येथे कपडे खरेदी केल्याची पावती होती. पावतीवरून तरुणांच्या कुटुंबापर्यंत संपर्क साधण्यात आला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोन्हीही तरुण आपल्या आई-वडिलांना एकुलते एक होते. शनिवार दि.९ रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.