
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात प्रसूती झालेल्या दोन महिलांनी आपल्या बालकांना तेथेच सोडून पलायन केले आहे. यातील एका बालकाचा मृत्यू झाला असून दुसरे बालक जिल्हा रूग्णालयात आहे. त्या बालकाला स्नेहालय संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एक महिला सोनई (ता. नेवासा) व दुसरी पुणतांबा (ता. राहाता) येथील आहे.
दरम्यान याप्रकरणी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेमणूकीस असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संतोष विधाते यांनी सोनई व राहाता पोलिसांना याबाबत माहिती दिली असून त्या महिलांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. सोनई येथील महिला प्रसूतीसाठी 28 जुलै, 2022 रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती. 1 ऑगस्ट रोजी तिची प्रसूती झाली. दरम्यान प्रसूती होताच तिने बालकाला सोडून पळ काढला आहे. ही बाब जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी बुधवारी (दि. 3) सकाळी सोनई पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. दरम्यान सदर बालकाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणतांबा येथील 35 वर्षीय महिलेला 24 जुलै, 2022 रोजी प्रसूतीसाठी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात घेवून येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. तीने 27 जुलै, 2022 रोजी बालकाला सोडून पलायन केले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विधाते यांनी राहाता पोलिसांना बुधवारी सकाळी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहे.