कोयत्याचा वार करून दोघा ट्रक ड्रायव्हरला लुटले

२ आरोपी पकडले; तिघा जणांचा पोलिसांना गुंगारा
कोयत्याचा वार करून दोघा ट्रक ड्रायव्हरला लुटले

कोल्हार | वार्ताहर

कोल्हार (वार्ताहर)- मालेगाव येथून बाजरीचे पोते घेऊन दोन मालट्रक कुरकुम, दौंडकडे निघाले. कोल्हारजवळ नगर-मनमाड महामार्गावर एका हॉटेलजवळ मालट्रकचा टायर पंक्चर झाला. टायर बदलत असताना कोल्हारकडून 5 अनोळखी चोरट्यांनी हातातील कोयत्याने वार करून ट्रक चालकांकडील रोख रक्कम व मोबाईल दरोडा टाकून चोरून नेले. लोणी पोलिसांना खबर मिळताच मोठ्या शिताफीने पाठलाग करून निर्मळ पिंपरी शिवारात 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र उर्वरित तिघा जणांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा दिला.

यासंदर्भात ट्रक चालक किशोर मोतीराम दुकळे (वय 32), रा. चौंडी जळगाव, ता. मालेगाव यांनी फिर्याद दिली. किशोर दुकळे हे त्यांची मालट्रक (क्रमांक-एमएच 18 बीजी 2797) तसेच त्यांच्यासोबत दत्तू उत्तम शेरमाळे हे त्यांची मालट्रक (क्रमांक-एमएच 41 केयु 5575) मध्ये मालेगाव येथील कुणाल ट्रेडर्स येथून बाजरीचे पोते घेऊन कुरकुम, दौंड येथे जात असताना ही घटना घडली. गुरुवार दि. 29 एप्रिल रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोल्हार येथे एका हॉटेलजवळ नगर - मनमाड महामार्गावर ट्रकचा टायर पंक्चर झाला. त्यांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला उभे करून टायर बदलत होते. त्याचवेळी 5 चोरट्यांनी कोल्हार गावाकडून येऊन त्यांच्या हातातील कोयत्याने दोघा ट्रक चालकावर वार केले. त्यांच्याकडील 11 हजार रुपये रोख रक्कम व 2 मोबाईल हँडसेट असा 21 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला.

कोयत्याचा वार करून दोघा ट्रक ड्रायव्हरला लुटले
निपाणी वडगाव हद्दीत अनोळखी तरुणाचा मृतदेह

यासंदर्भात खबर मिळताच लोणी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी, पोहेकॉ सुर्यभान पवार, दहिफळे, संपत जायभाये, गवांदे, जाधव यांनी मोठ्या शिताफीने आरोपींची पिक अप (क्रमांक-एमएच 42 एम 1430) हिचा पाठलाग करून निर्मळ पिंपरी, ता. राहाता गावाच्या शिवारात 5 पैकी 2 आरोपींना पकडले.

किरण भाऊसाहेब जाधव (वय 21) रा. देहरे, ता. नगर, विशाल प्रभाकर साठे (वय 20) रा. ब्राह्मणी, ता. राहुरी यास शेतात पाठलाग करून पकडले. 3 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेले. पकडलेल्या आरोपींकडून पळून गेलेल्या आरोपींचे समजलेली नावे किरण अर्जुन आजबे, रा. भिंगार, शाहरुख सय्यद (पूर्ण नाव माहित नाही), दिपक, रा. नाऊर, ता. श्रीरामपूर (पूर्ण नाव माहीत नाही) हे असल्याबाबत निष्पन्न झाले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप व गुन्ह्यातील मोबाईल तसेच लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 395, 397 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे लोणी पोलीस ठाण्याचे सपोनि समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल सूर्यभान पवार, पोलीस नाईक दहिफळे, संपत जायभाये, गवांदे, जाधव यांच्या पथकाने केल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com