
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भाडोत्री खोली सोडून दिल्याच्या रागातून दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना नागापुर परिसरात घडली. विजय सुरजीलाल सोनकर (वय 28 रा. मिर्झापुर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. नागापूर) व आशिष सोनकर यांना मारहाण झाली आहे. या प्रकरणी विजय सोनकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बंटी शिंदे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय सोनकर हे बंदी शिंदे याच्या भाडोत्री खोलीमध्ये राहत होते. त्यांनी ती खोली सोडून दिली होती. याच कारणातून बंटी शिंदे याने विजय सोनकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच विजय सोनकर यांना होत असलेली मारहाण सोडविण्यासाठी त्यांचा चुलत भाऊ आशिष सोनकर तेथे आला असता त्याला देखील तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक आंधळे करीत आहेत.