नववधू'सह आणखी दोन करोना अहवाल पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यातील जांभळे ग्रामपंचायत हद्दीतील काळेवाडी येथे दि. २५ जून २०२० रोजी झालेल्या लग्नातील 'नववधू' पॉझिटिव्ह तर 'वर' निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
corona
corona

ब्राह्मणवाडा |वार्ताहर | Bramhanwada

अकोले तालुक्यातील काळेवाडी येथे जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या लग्नातील 'नववधू', जांभळे येथील एक युवक व ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत हद्दीतील एक अशा तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्राह्मणवाडा येथे दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्या वाढत असून आता काळेवाडी,जांभळे परिसरातही कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आपल्या परीने मेहनत घेत असले तरी साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सदर लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांचा कसून शोध घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

अकोले तालुक्यातील जांभळे ग्रामपंचायत हद्दीतील काळेवाडी येथे दि. २५ जून २०२० रोजी झालेल्या लग्नातील 'नववधू' पॉझिटिव्ह तर 'वर' निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. याशिवाय जांभळे येथील एक युवक तसेच ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत हद्दीतील बाभूळवंडी येथील पूर्वीच्या बाधित युवकाच्या संपर्कातील त्याच्या मित्राचा करोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. काळेवाडीच्या लग्नात करोना बाधित युवकाने हजेरी लावली होती त्यामुळे लग्नात सहभागी झालेल्या लोकांची यादी पुन्हा एकदा तयार करण्याचे काम सुरु आहे.

या संदर्भात ब्राह्मणवाडा आरोग्य अधिकारी डॉ.भारत टाळे यांचेशी संपर्क साधला असता पॉझिटिव्ह रुग्ण व काळेवाडी येथील हायरिस्क असलेले सात जण यांना संगमनेर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे,असे स्पष्ट केले. दरम्यान काळेवाडी हे जांभळे ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने जांभळे येथील करोना बाधित रुग्ण संख्या सहा झाली असून त्यापैकी चार बरे झाले आहेत तर दोन ( काळेवाडी, जांभळे प्रत्येकी एक ) एक्टिव आहेत. तर ब्राह्मणवाडा येथील एकूण करोना रुग्ण संख्या सात झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com